गेमिंग फ्रॉडसह विविध सायबर फसवणुकींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
![]()
गेमिंग फ्रॉडसह विविध सायबर फसवणुकींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
जळगाव प्रतिनिधी : वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांना सुरक्षित राहण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील क्विक हील फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.
या उपक्रमांतर्गत दि. २१ आणि २२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात इयत्ता सहावीच्या ते दहावीच्या सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना गेमिंग फ्रॉड, ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड तसेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) चे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
या जनजागृती कार्यक्रमात वैष्णवी पाटील, स्नेहल पाटील, जय ठाकोर, राहुल चोपडे, तनिषा महाजन, तेजस्विनी पाटील, जान्हवी सपकाळे, वैष्णवी सैतवाल, प्रियदर्शनी भंडारकर आणि खुशबू लांभोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा झांबरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच क्विक हील फाउंडेशनच्या फील्ड इन्स्पेक्टर श्रीमती निलिमा जावळे यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहून उपक्रमाचे मार्गदर्शन व निरीक्षण केले. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेविषयी अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी सत्रादरम्यान विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षिततेविषयी उत्सुकता व्यक्त केली. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

