अमळनेर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अभिषेक पाटील; उपाध्यक्षपदी वसुंधराताई लांडगे
1 min read

अमळनेर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अभिषेक पाटील; उपाध्यक्षपदी वसुंधराताई लांडगे

Loading

अमळनेर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अभिषेक पाटील; उपाध्यक्षपदी वसुंधराताई लांडगे

 

अमळनेर प्रतिनिधी अमळनेर

अमळनेर येथील दि अमळनेर को-ऑप अर्बन बँक लि.च्या अध्यक्षपदी श्री. अभिषेक (मोना) पाटील, तर उपाध्यक्षपदी सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांची सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता बँकेच्या सभागृहात बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा संचालक मंडळासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

ठरल्याप्रमाणे मावळत्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले भरत ललवाणी तसेच उपाध्यक्ष लक्ष्मण महाजन यांनी ठरलेल्या कार्यकाळानुसार एक वर्षाची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर आपल्या पदांचे राजीनामे दिले. त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी संचालक मंडळातर्फे निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी निवडणूक अधिकारी व्ही. एम. जगताप तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी सुनील महाजन यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. संचालक मंडळाच्या सर्वानुमते अभिषेक (मोना) पाटील यांची अध्यक्षपदी आणि वसुंधरा दशरथ लांडगे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

 

 

मावळत्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान; नूतन नेतृत्वाचे स्वागत

नूतन अध्यक्ष अभिषेक पाटील व उपाध्यक्ष वसुंधराताई लांडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मावळते अध्यक्ष भरतुकुमार सुरेश ललवाणी व मावळते उपाध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग महाजन यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल संचालक मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर सर्व संचालक मंडळाने नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सभासद हिताला प्राधान्य देण्याची ग्वाही

निवडीनंतर नूतन अध्यक्ष अभिषेक (मोना) पाटील व उपाध्यक्ष वसुंधराताई लांडगे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. बँकेच्या सभासदांचा विश्वास आणि संचालक मंडळाने सोपविलेली जबाबदारी ही आपल्यासाठी महत्त्वाची असून, आगामी काळात सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी तसेच बँकेच्या प्रगतीसाठी पूर्ण क्षमतेने काम करण्यास आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अर्बन बँकेच्या माध्यमातून सभासद, ठेवीदार, खातेदार व ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्याबरोबरच बँकेच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचा मानस नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

संचालक मंडळाची उपस्थिती

यावेळी बँकेचे संचालक प्रवीण रामलाल जैन, पंकज गोविंद मुंदडे, प्रदीपकुमार कुंदनलाल अग्रवाल, दीपक छबुलाल साळी, प्रवीण श्रीराम पाटील, पंडित रामचंद्र चौधरी, रणजित भास्कर शिंदे, मोहन बाळाजी सातपुते, डॉ. सौ. मनिषा विवेकानंद लाठी, अँड. विनायक राजाराम पाटील, अँड. विजय जगन्नाथ बोरसे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत रामभाऊ पाटील उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीमुळे बँकेच्या नेतृत्वात झालेल्या या बदलाकडे सभासद व खातेदारांचे लक्ष लागले असून, नव्या नेतृत्वाखाली बँकेच्या कारभाराला अधिक गतिमान दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा झाला सत्कार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *