संकल्प, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर उत्कर्षाची वैद्यकीय भरारी! ,दहावीत ९६.८० टक्के, नीट-२०२६ मध्ये ५७० गुण; नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश
![]()
संकल्प, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर उत्कर्षाची वैद्यकीय भरारी!
दहावीत ९६.८० टक्के, नीट-२०२६ मध्ये ५७० गुण; नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश
अमळनेर प्रतिनिधी
“अडचणी कितीही आल्या तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहिले, तर यश नक्कीच मिळते,” या विचाराला आपल्या कर्तृत्वातून सार्थ ठरवत उत्कर्ष हरी माळी हिने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दहावीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण मिळवत साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या उत्कर्षाने नीट-२०२६ परीक्षेत ५७० गुण मिळवून वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या पहिल्या फेरीत तिला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे एमबीबीएसला प्रवेश मिळाला आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक, नातेवाईक आणि शिक्षण क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी
“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,” या उक्तीप्रमाणे उत्कर्षाला लहानपणापासूनच अभ्यासाची विशेष आवड होती. अभ्यासाबरोबरच परिस्थितीशी जुळवून घेत स्वतःची जबाबदारी सांभाळण्याची तिची वृत्तीही लहानपणापासूनच दिसून आली.
उत्कर्षाचे आई-वडील दोघेही माध्यमिक शिक्षक असल्याने त्यांना अनेकदा शाळेच्या कामासाठी वेळ द्यावा लागत असे. अशा परिस्थितीत उत्कर्षाने स्वतःच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता घरातील जबाबदाऱ्याही समजून घेतल्या. अनेक वेळा आई-वडिलांच्या अनुपस्थितीत तिने लहान भावाची काळजी घेतली आणि स्वतःच्या अभ्यासाचेही नियोजन केले.
आई-वडिलांच्या शाळेतच मिळाली शिक्षणाची प्रेरणा
उत्कर्षाच्या शैक्षणिक जडणघडणीत आई-वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. लहान असतांना आई-वडील नोकरीवर असतांना तिला अनेकदा शाळेत घेऊन जात असत. आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांमध्ये मोठ्या विद्यार्थ्यांसोबत बसून वर्गात सुरू असलेले अध्यापन ऐकण्याची तिची आवड होती.
मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे विषय ती उत्सुकतेने ऐकत असे. त्यामुळे लहान वयातच तिच्या मनात अभ्यासाची आवड आणि शिकण्याची जिज्ञासा निर्माण झाली. प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाच्या काळातही तिच्या यशाची वाटचाल सातत्यपूर्ण आणि कौतुकास्पद राहिली.
ध्येय निश्चित होते—वैद्यकीय क्षेत्रातच जायचे!
माध्यमिक शिक्षण घेत असतांनाच उत्कर्षाने आपल्या भविष्यातील ध्येय निश्चित केले होते. “मला वैद्यकीय क्षेत्रात जायचे आहे,” हा विचार तिने मनाशी पक्का केला होता. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवत तिने मेहनत घेतली.
नीट परीक्षेची तयारी करतांना अनेक आव्हाने आली. मात्र, अडचणींचा बाऊ न करता त्यावर मात करत तिने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. नीट परीक्षेत ५७० गुण मिळवत तिने आपली मेहनत सिद्ध केली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशाचे स्वप्न साकार केले.


कमी गुण आले तरी खचली नाही
नीटच्या तयारीदरम्यान सराव चाचण्यांमध्ये कधी एक-दोन गुण कमी मिळाले तरी उत्कर्षाला काहीवेळा तणाव जाणवत असे. मात्र, अशा वेळी आई-वडिलांनी तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहत तिला सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा दिली.
“एका परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून घाबरायचे नाही. पुढच्या परीक्षेचा अभ्यास करून पुन्हा प्रयत्न करायचा,” हा मूलमंत्र आई-वडिलांनी तिला दिला. सराव परीक्षेत मिळालेल्या गुणांपेक्षा त्यातून काय शिकता आले, याचा आनंद घ्यावा आणि पुढील तयारी अधिक चांगली करावी, असा दृष्टिकोन त्यांनी तिच्यात निर्माण केला.
याच सकारात्मक विचारसरणीमुळे उत्कर्षाने अभ्यासातील चढ-उतारांना सामोरे जात सातत्य कायम ठेवले.
साधी राहणी, उच्च विचार आणि मेहनती स्वभाव
उत्कर्षा अत्यंत मेहनती, मितभाषी, मवाळ आणि साध्या स्वभावाची असल्याचे तिच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या गुणांसोबतच कोणतेही काम सातत्याने करण्याची तिची वृत्ती तिच्या यशामागील महत्त्वाची ताकद ठरली.
अभ्यासाबरोबरच तिला चित्रकलेचीही विशेष आवड असून ती चांगल्या प्रकारे चित्र काढते. अभ्यासाचा ताण न घेता आपल्या आवडीच्या छंदालाही तिने वेळ दिला आणि तो जोपासला.
आई-वडिलांचे मार्गदर्शन ठरले यशाचे बळ
उत्कर्षाचे वडील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव देवळी येथे इंग्रजी विषयाचे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर आई मनीषा महाजन या रूधांटी येथे माध्यमिक शिक्षिका आहेत. दोघेही शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे घरातच शिक्षणाचे वातावरण मिळाले.
आई-वडिलांच्या मार्गदर्शनासोबतच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन उत्कर्षाच्या यशासाठी महत्त्वाचे ठरले. एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतर आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील, क्लासेसचे
मार्गदर्शक शिक्षक आणि सानेगुरुजी शाळेतील मुख्याध्यापिका अनिता बोरसे मँडम व
शिक्षकांना दिले.
यशाने कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे एमबीबीएसला प्रवेश मिळाल्याची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उत्कर्षावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तिच्या यशाबद्दल तिचा तसेच आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
उत्कर्षाच्या या यशातून ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे प्रोत्साहन यांची सांगड घातल्यास कोणतेही स्वप्न साकार करता येते, हा प्रेरणादायी संदेश मिळतो.असे पत्रकार ईश्वर महाजन यांच्याशी बोलतांना तिने सांगितले
शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
उत्कर्षाच्या उल्लेखनीय यशाबद्दल साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापिका अनिताताई बोरसे, मुख्याध्यापक सुनील पाटील व शिक्षकवृंद, तसेच महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, संचालक मंडळ आणि रूधांटी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.
उत्कर्षाची यशाची वाटचाल
दहावी — मार्च २०२४ : ९६.८०% गुण
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये प्रथम
बारावी — फेब्रुवारी २०२० : ८५.८३ गुण
नीट-२०२६ : ५७० गुण
एमबीबीएस प्रवेश — इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
“ध्येय मोठे असेल तर अडचणी अडथळे ठरत नाहीत; सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यशाचा मार्ग दाखवते.”
उत्कर्षाच्या या प्रेरणादायी यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि वैद्यकीय क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!







