लोक वर्गणी’ व पाणीपट्टीवरील २% व्याजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; ग्राहक पंचायतचे नगरपरिषदेला निवेदन
![]()
‘लोक वर्गणी’ व पाणीपट्टीवरील २% व्याजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; ग्राहक पंचायतचे नगरपरिषदेला निवेदन
बेकायदेशीर वसुली तातडीने थांबविण्याची मागणी; मुख्याधिकाऱ्यांकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
अमळनेर | प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषदेकडून नागरिकांकडून “लोक वर्गणी”च्या नावाखाली करण्यात येणारी वसुली तसेच पाणीपट्टीवर आकारण्यात येणाऱ्या दोन टक्के व्याजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेरच्या वतीने शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देऊन या दोन्ही वसुली तातडीने बंद करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर नगरपरिषद अनेक वर्षांपासून नागरिकांकडून “लोक वर्गणी” या नावाखाली बेकायदेशीर व बळजबरीने रक्कम वसूल करत आहे. या वसुलीस कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावा करत ग्राहक पंचायतीने ती त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय, सन २०२४-२५ पासून आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असतानाही नगरपरिषदेकडून ३१ डिसेंबरपासूनच पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कावर दोन टक्के दराने व्याज आकारले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचेही ग्राहक पंचायतीने नमूद केले आहे.
यापूर्वी १७ डिसेंबर २०२४, २२ एप्रिल २०२५ आणि ६ फेब्रुवारी २०२६ रोजीही याच विषयावर निवेदने देण्यात आली होती. त्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी भविष्यात लोक वर्गणी आणि दोन टक्के व्याज आकारणी केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्राहक पंचायतीने पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी या विषयाची सकारात्मक दखल घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने अँड. भारती अग्रवाल, सौ. कपीला मुठे, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सतीश देशमुख तसेच ज्येष्ठ पत्रकार व कवी-लेखक सुभाष पाटील घोडगावकर यांच्यासह ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

