मोबाईलपासून चार वर्षे दूर, सातत्यपूर्ण अभ्यास अन् आत्मशिस्तीच्या बळावर सई देसलेची नीटमध्ये जिल्ह्यात प्रथम झेप  नीटमध्ये ६७१ गुण; देशात ४६३ वा क्रमांक, एम्समध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर
1 min read

मोबाईलपासून चार वर्षे दूर, सातत्यपूर्ण अभ्यास अन् आत्मशिस्तीच्या बळावर सई देसलेची नीटमध्ये जिल्ह्यात प्रथम झेप नीटमध्ये ६७१ गुण; देशात ४६३ वा क्रमांक, एम्समध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर

Loading

मोबाईलपासून चार वर्षे दूर, सातत्यपूर्ण अभ्यास अन् आत्मशिस्तीच्या बळावर सई देसलेची नीटमध्ये जिल्ह्यात प्रथम झेप

नीटमध्ये ६७१ गुण; देशात ४६३ वा क्रमांक, एम्समध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर

जळगाव : प्रतिनिधी
“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी,” असे संतांनी सांगितले आहे. घरातील उत्तम संस्कार, अभ्यासाला पोषक वातावरण, पालकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्याची जिद्द यांचा सुंदर संगम घडला, तर यश निश्चित मिळते. याच विचाराचा प्रत्यय यंदाच्या नीट (NEET-UG) परीक्षेच्या निकालातून आला आहे.
जळगाव येथील अर्थशास्त्र विषयाचे सुप्रसिद्ध लेखक व प्राध्यापक डॉ. किरण देसले आणि डॉ.गीता देसले यांची कन्या सई देसले हिने नीट परीक्षेत ६७१ गुण मिळवत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच तिने भारतीय स्तरावर ४६३ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले असून, देशातील प्रतिष्ठित एम्स संस्थेत प्रवेशाचा मार्ग तिच्यासाठी खुला झाला आहे.
साध्या, सुसंस्कारित आणि शैक्षणिक वातावरण लाभलेल्या कुटुंबात वाढलेल्या सईने हे यश केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर नव्हे, तर सातत्यपूर्ण परिश्रम, आत्मशिस्त आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर मिळवले आहे. च्या आई या व्यवसायाने डॉक्टर आहेत. वडील किरण देसले हे महाराष्ट्रातील नामवंत अर्थतज्ञ आणि स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र विषयाचे प्रथित यश लेखक आहेत.

चार वर्षे मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर

सईच्या यशामागे तिची अभ्यासाची शिस्त विशेष ठरली. इयत्ता नववीपासून तब्बल चार वर्षे तिने मोबाईल आणि सोशल मीडियापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवले. या काळात तिने वेळेचे काटेकोर नियोजन करत दररोज नियमित अभ्यास, प्रश्नपत्रिकांचा सराव, व्यायाम आणि ध्यान यांचा दिनक्रम कायम ठेवला. मोबाईलपासून दूर राहिल्यामुळे अभ्यासात अधिक एकाग्रता साधता आली आणि ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करता आले, असे सईने सांगितले.

सईसारखी विद्यार्थिनी आणि ती माझी मुलगी असणे हे माझे भाग्य’

मुलीच्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. किरण देसले म्हणाले,

“मी मागील पंचवीस वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. या काळात हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी जवळून पाहिले; मात्र सईसारखी आदर्श विद्यार्थिनी लाभणे आणि ती माझी स्वतःची मुलगी असणे, हे मी माझे भाग्य समजतो. ध्येय निश्चित झाल्यानंतर तिने कधीही विचलित न होता सातत्याने मेहनत घेतली. ध्येयाप्रती तिची असलेली एकनिष्ठता, आत्मशिस्त आणि चिकाटी यामुळेच तिने हे यश संपादन केले.”
सौ. गीता देसले यांनी सांगितले की, “घरातील वातावरण सकारात्मक ठेवणे, मुलांवर विश्वास ठेवणे आणि त्यांच्या भावनांना समजून घेणे हे पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. मुलांना केवळ गुणांसाठी नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांसाठी प्रेरित केले पाहिजे.”

पालकांसाठी मोलाचा संदेश

डॉ. किरण देसले आणि गीता देसले यांनी यावेळी पालकांना महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले,

“मुलांना सतत ओरडून किंवा दमदाटी करून अभ्यासाला बसवू नका. प्रत्येक मुलाची क्षमता आणि अभ्यासाची पद्धत वेगळी असते. ती ओळखून त्याला योग्य दिशा द्या. विद्यार्थ्यांचा अभ्यास हा फक्त विद्यार्थ्यांचा नसतो; त्यामध्ये पालकांचाही तितकाच सहभाग असतो. विशेषतः या वयात मुलांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे.”

त्यांच्या मते, दररोज किमान पाच ते सहा तास नियोजनबद्ध अभ्यास सलग दोन वर्षे सातत्याने केल्यास नीटसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळविणे शक्य आहे.

यशाची गुरुकिल्ली

डॉ. देसले यांच्या मते, सईच्या यशामागे काही ठळक सवयी होत्या—

* विषयाच्या संकल्पना मुळापासून समजून घेणे.
* नियमित आणि नियोजनबद्ध अभ्यास.
* प्रश्नपत्रिका व MCQ चा सातत्यपूर्ण सराव.
* मोबाईल आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणे.
* नियमित व्यायाम आणि ध्यान.
* वेळेचे प्रभावी नियोजन.
* ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित ठेवणे.

“फक्त पाठांतर नव्हे, तर संकल्पना समजून अभ्यास केल्यास कोणतीही स्पर्धा परीक्षा कठीण राहत नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

सई देसलेच्या या दैदिप्यमान यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिची यशोगाथा हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संस्कार, सातत्यपूर्ण परिश्रम, आत्मशिस्त आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे सईने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *