माहेरचा पारिजात‌’अंतर्गत माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची दुनिया! , कपिलेश्वर महादेवांचे दर्शन, निसर्गाच्या सान्निध्यात भोजनासह लुटला विविध गुणदर्शनांचा आनंद
1 min read

माहेरचा पारिजात‌’अंतर्गत माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची दुनिया! , कपिलेश्वर महादेवांचे दर्शन, निसर्गाच्या सान्निध्यात भोजनासह लुटला विविध गुणदर्शनांचा आनंद

Loading

‌‘माहेरचा पारिजात‌’अंतर्गत माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची दुनिया!

कपिलेश्वर महादेवांचे दर्शन, निसर्गाच्या सान्निध्यात भोजनासह लुटला विविध गुणदर्शनांचा आनंद

अमळनेर प्रतिनिधी : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा अर्थात ‌‘माहेरचा पारिजात‌’ या उपक्रमाची काल शनिवार, दि. 29 ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. यात दिवसभरातील विविधांगी आनंद लुटल्यानंतर श्री मंगळग्रह मंदिरात सर्व माहेरवाशिणींनी विविध खेळ, नृत्य, गप्पागोष्टींद्वारे रात्र जागून काढली. या उपक्रमासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या स्नेहमेळ्यांतर्गत आज दुसऱ्या दिवशी अर्थात रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी उपस्थित सर्व महिला पहाटे पाच वाजता उठून अतिशय रम्य, शांत, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प. पू. संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेत फेरफटका मारण्यासाठी गेल्या. सदर रोपवाटिकेत पक्ष्यांसाठी बाराही महिने पिण्याचे पाणी व त्यांना खाण्यासाठी सर्व प्रकारचे धान्य ठेवलेले असते तसेच मंदिर परिसरातील झाडांवर पक्ष्यांना अंडी देण्यासाठी व उबविण्यासाठी तसेच नवजात अर्भकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे शंभर मडकी बांधली आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे मंगळग्रह मंदिर आश्रयस्थान झाले आहे. फेरफटका मारणाऱ्या महिलांना या सर्व प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन झाले तसेच पक्ष्यांचे विविध प्रकारचे कर्णमधूर आवाज ऐकून सर्वांनाच मनस्वी आनंद झाला. ही जणू त्यांच्यासाठी सुमधूर सुगंधी सुप्रभात सफर ठरली. यावेळी काहींनी आपले दैनंदिन व्यायामाचे प्रकार तसेच योगसाधना केली. त्यानंतर सर्वांनी स्नानानंतर सकाळी सात वाजता श्री मंगळग्रह देवांची सामूहिकरित्या आरती केली. साडेआठ ते साडेनऊ वाजेदरम्यान अल्पोपहार घेतला. त्ंयानंतर अमळनेर डेपोच्या बसमधून प्रवास करीत नीम (ता. अमळनेर) येथील तापी, पांझरा व लुप्त गंगा या नद्यांच्या संगमावर वसलेल्या तीर्थक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरात सकाळी साडेदहा वाजता पोहोचल्या. तेथे सर्वांनी श्रद्धापूर्वक श्री कपिलेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. यावेळी काही माहेरवाशिणींनी अभंग व भजने गात आध्यात्मिक सेवाही श्री कपिलेश्वरांच्या चरणी अर्पित केली. दुपारच्या भोजनानंतर जवळपास अर्धातास गप्पागोष्टी, हास्य-विनोदात रंगल्यानंतर बसमधून त्यांनी पुनश्च श्री मंगळग्रह मंदिर गाठले. मंदिरात दुपारी चार वाजेपासून पारंपरिक सागर गोटे, काचा-कवड्या, चौपट, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, उभा खो-खो, लगोरी, बेसबॉल, आंधळी कोशिंबीर, संगीत खुर्ची आदी खेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत खेळले. त्यांनतर सर्वांनी श्री मंगळग्रह सामूहिक सायंआरती केली. सायंकाळी साडेसात वाजेपासून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. त्यातील मिमिक्रीने सर्वांची मनोसोक्त करमणूक केली. रात्रीच्या भोजनानंतर सर्वांनी शेकोटीसह नृत्य व गायनाचा रात्री उशिरापर्यंत सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.
यावेळी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे व कोशाध्यक्षा प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्या उपस्थित होते.
स्नेहमेळ्यात आज (सोमवार,
दि. 31 ऑगस्ट) होणारे कार्यक्रम
सकाळी 8.30 वाजता नाश्ता. 9.30 वाजता माहेरवाशिणींचे ओटी भरण व स्नेहमेळ्याचा समारोप.

फोटो….
अमळनेर : अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा अर्थात ‌‘माहेरचा पारिजात‌’ या उपक्रमांतर्गत रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी नीम (ता. अमळनेर) येथे कपिलेश्वर महादेवांचे दर्शन घेतल्यानंतर अभंग व भजने गायनात रंगलेल्या माहेरवाशिणी. दुसऱ्या छायाचित्रात कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरातील निसर्गाच्या सान्निध्यात भोजनाचा आस्वाद घेताना माहेरवाशिणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *