वाढदिवस विशेष… , अमळनेरच्या विकासासाठी ‘निकम मॉडेल’ची नवी दिशा! , उद्योजकतेतून राजकारणात प्रवेश; नगरसेवक ते उपनगराध्यक्ष असा वेगवान प्रवास — शहराच्या प्रश्नांवर थेट मैदानात उतरलेले प्रशांत निकम
1 min read

वाढदिवस विशेष… , अमळनेरच्या विकासासाठी ‘निकम मॉडेल’ची नवी दिशा! , उद्योजकतेतून राजकारणात प्रवेश; नगरसेवक ते उपनगराध्यक्ष असा वेगवान प्रवास — शहराच्या प्रश्नांवर थेट मैदानात उतरलेले प्रशांत निकम

Loading

वाढदिवस विशेष…

अमळनेरच्या विकासासाठी ‘निकम मॉडेल’ची नवी दिशा!

उद्योजकतेतून राजकारणात प्रवेश; नगरसेवक ते उपनगराध्यक्ष असा वेगवान प्रवास — शहराच्या प्रश्नांवर थेट मैदानात उतरलेले प्रशांत निकम

अमळनेर प्रतिनिधी :
व्यवसायात गुणवत्ता, सार्वजनिक जीवनात सक्रियता आणि विकासाच्या प्रश्नांवर थेट भूमिका—या त्रिसूत्रीवर आपली वाटचाल पुढे नेणारे प्रशांत निकम हे नाव अमळनेरच्या सार्वजनिक जीवनात सध्या चर्चेत आहे. पुण्याहून २००८ मध्ये अमळनेरमध्ये परतल्यानंतर बांधकाम क्षेत्रातून व्यावसायिक प्रवासाला सुरुवात करणाऱ्या निकम यांनी विविध क्षेत्रांत कामाचा विस्तार केला. त्यानंतर समाजकारणाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात प्रवेश करत अवघ्या काही वर्षांत नगरसेवक ते उपनगराध्यक्ष असा प्रवास केला.
१ सप्टेंबर रोजी प्रशांत निकम यांचा वाढदिवस असून, त्यांच्या व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा घेतलेला हा आढावा.

बांधकाम व्यवसायात वेगळी ओळख

अमळनेरमध्ये परतल्यानंतर प्रशांत निकम यांनी बांधकाम व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. गुणवत्ता आणि विश्वासाला प्राधान्य देत त्यांनी अनेक निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारले.
नानासाहेब मनोहर संकुल, आदित्य संकुल, हिराई पार्क, शिव हाईट, भद्रा संकुल, राजगड प्लाझा, निकम प्लाझा, रायगड प्लाझा, रमाई प्लाझा, निकम हाईट, आदित्य कॉर्नर, सिंहगड प्लाझा, राजगड हाईट, आदित्य प्लाझा, अयोध्या नगर, जिजाऊ रोहाऊस, शंकर प्लाझा, रतन हाईट, शाहू पॅलेस, सन पॅराडाईस बंगलोज, सनसिटी टाऊनशिप आणि सनराईस अपार्टमेंट आदी प्रकल्प त्यांच्या व्यावसायिक प्रवासाचा भाग आहेत.
बांधकामासोबतच शिव पेट्रोलियम, अमळनेर आणि आदित्य पेट्रोलियम, पारोळा यांच्या माध्यमातून पेट्रोलियम व्यवसायातही त्यांनी विस्तार केला. पारोळा येथील पेट्रोल पंपावर ट्रकचालकांच्या विश्रांतीसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिक्षणाची व्याप्ती वाढवत कायद्याच्या क्षेत्रातही प्रवेश

व्यवसायासोबत शिक्षणाची वाटचालही त्यांनी सुरू ठेवली. साने गुरुजी शाळेतून दहावी, त्यानंतर धुळे येथील SSVPS महाविद्यालयातून डिप्लोमा आणि जळगावच्या SSBTS, बांभोरी येथून बी.ई. सिव्हिल पदवी त्यांनी प्राप्त केली.
कायद्याचे शिक्षण घेत २०२४ मध्ये LLB पूर्ण केले. सध्या ते LLMच्या अंतिम वर्षात असून भविष्यात PhD करण्याचा त्यांचा मानस आहे.
शेती क्षेत्रातही पारंपरिक पद्धतीला पर्याय शोधताना शेतजमीन सौरऊर्जा कंपनीला भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्नाचा पर्यायी मार्ग स्वीकारण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे.

राजकारणात एन्ट्री अन् थेट उपनगराध्यक्षपद!

वडील मनोहर नाना यांच्याकडून समाजसेवेचा वारसा मिळाल्यानंतर प्रशांत निकम यांनी २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
२०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेना गटाच्या सहकार्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
एकमेव नगरसेवक असतांनाही उपनगराध्यक्षपदापर्यंत झालेली त्यांची वाटचाल हा त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.

पदाची खुर्ची नाही; प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न

उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरातील विविध प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी करण्यावर त्यांनी भर दिला.
बसस्थानक परिसर, स्वच्छता व्यवस्था, अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, पिण्याचे पाणी, नागरिकांसाठी बाकडी आणि प्रसाधनगृह यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी पाहणी करून संबंधित यंत्रणेला सूचना केल्या.
पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर त्यांनी प्रत्यक्ष पाण्याच्या टाकीत उतरून पाहणी केली. त्यानंतर टाकी स्वच्छ करून घेण्यात आली. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्याचे सांगण्यात येते.

भुयारी गटार योजनेवर सवाल; निधीच्या वापरावरही आक्षेप

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अमळनेरच्या भुयारी गटार योजनेच्या कामाच्या गुणवत्तेचा मुद्दा निकम यांनी उपस्थित केला.
तुंबलेली चेंबर्स, रस्त्यावर येणारे पाणी तसेच गटारीचे पाणी नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी सुमारे ७० कोटींचा निधी वाया गेल्याचा आरोप केला. शहराच्या हितासाठी ही योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी केली.

समाजकारणाला दिले संस्थेचे व्यासपीठ

‘अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जुलै-ऑगस्टमध्ये ॲक्युप्रेशर, सुजोक आणि कपिंग थेरपीची शिबिरे घेण्यात आली.
महिलांसाठी अमळनेर शहरात प्रथमच मोफत लाठी-काठी प्रशिक्षण सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून शिवशक्ती आखाडा, टाकरखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.
यासोबतच भगवा चौक येथे स्वखर्चाने रायगडावरील नगारखाना दरवाज्याची दगडी प्रतिकृती उभारण्याचे आणि त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे.
सामाजिक क्षेत्रातील सहभाग वाढवत त्यांनी २०२६ मध्ये रोटरी क्लब अमळनेरच्या सचिवपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे.

परिवर्तनाकडून समृद्धीकडे’ — विकासाचा रोडमॅप

प्रशांत निकम यांच्या राजकीय भूमिकेचा केंद्रबिंदू ‘परिवर्तनाकडून समृद्धीकडे’ हा विचार असल्याचे ते सांगतात.

ग्रामीण भागात जलसंधारण, शाश्वत जलजीवन, शेततळी, नाले-नदी जोड आणि नदीजोड प्रकल्प राबवून अमळनेर तालुका सुजलाम्-सुफलाम् करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
शहरासाठीही त्यांनी रोजगार आणि उद्योगवाढीचा मुद्दा पुढे ठेवला आहे. विप्रोसारख्या कंपन्यांना प्रोत्साहन, MIDCमध्ये नवीन उद्योग, शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर रोजगारनिर्मिती यावर त्यांचा भर आहे.

तरुणांसाठी शिक्षणाची दारे, रोजगाराच्या संधींचे लक्ष्य

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण मिळावे यासाठी प्रत्येक गावात लायब्ररी, अभ्यासिका आणि अभ्यासवर्ग निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षण, उद्योग आणि रोजगार या तीन गोष्टींची सांगड घालून तरुणांना स्थानिक पातळीवर संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे व्हिजन आहे.
भविष्यात आमदार म्हणून निवडणूक लढवून अमळनेर तालुक्याच्या ग्रामीण आणि शहरी विकासाला व्यापक दिशा देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

फक्त पुढारी नव्हे; संपूर्ण तालुका समृद्ध झाला पाहिजे!”

“फक्त पुढारी समृद्ध होण्यापेक्षा संपूर्ण तालुका समृद्ध झाला पाहिजे. प्रत्येक शेतकरी, व्यापारी आणि समाजातील सर्व घटक सक्षम झाले पाहिजेत. युवा पिढीला चांगले शिक्षण आणि रोजगार मिळाला पाहिजे,” या भूमिकेतून आपली सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरू असल्याचे प्रशांत निकम सांगतात.
उद्योजकता, शिक्षण, कायदा, समाजसेवा आणि राजकारण या विविध क्षेत्रांचा अनुभव एकत्रित करत अमळनेरच्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्याची आणि शाश्वत विकासाची दिशा देण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
दादासाहेब वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
अमळनेरच्या विकासाच्या नव्या पर्वासाठी कार्यरत असलेल्या प्रशांत निकम यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *