मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेत मातीसोबत खेळत साकारली सर्जनशीलता! , डॉ. लीना चौधरी यांनी गणेशमूर्ती निर्मितीसोबत श्रद्धा, कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचे दिले संस्कार
![]()
मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेत मातीसोबत खेळत साकारली सर्जनशीलता!
डॉ. लीना चौधरी यांनी गणेशमूर्ती निर्मितीसोबत श्रद्धा, कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचे दिले संस्कार
अमळनेर प्रतिनिधी: साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित ‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मातीसोबत खेळत गणेशमूर्ती साकारण्याचा अनोखा आनंद अनुभवला. या कार्यशाळेत डॉ. लीना चौधरी यांनी उपस्थितांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देतानाच श्रद्धा, कृतज्ञता आणि जिव्हाळा या मूल्यांचा अर्थही अत्यंत सहजतेने उलगडून सांगितला.
गणपती बाप्पाच्या सजावटीत पर्यावरणपूरकतेचा आग्रह धरत डॉ. चौधरी यांनी पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन केले तरच खऱ्या अर्थाने बाप्पा प्रसन्न होतील, असा संदेश दिला. आपल्या श्रद्धेमुळे इतरांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असेल, तर ते टाळण्याची जबाबदारीही आपलीच आहे, असे त्यांनी सांगितले.
‘गणपती बाप्पा भेदभाव विसरून माणसाला एकोप्याने राहण्याचा संदेश देतात,’ हा विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. घरातील कुंडीत गणपतीचे विसर्जन करून त्यामध्ये सुगंधी फुलांचे रोप लावावे. त्याचा निर्मळ सुगंध आपल्या जीवनासोबतच आपल्या कार्य-चारित्र्यातही दरवळत राहील, असा सुंदर संदेश त्यांनी दिला.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अजय भिल, चेतन भोई, कल्पेश वाणी, दर्शना पवार, डॉ. अतुल चौधरी, गोपाळ नेवे, तुषार पाटील, शुभम पवार, राहुल पाटील, साक्षी सोनार, उमेश सोनार, डॉ. सचिन पाटील, डॉ. मिलिंद वैद्य, सतीश देशमुख, सचिन पाखले व मिनोती जगताप यांनी विशेष प्रयत्न केले.
**‘गणपती बाप्पा मोरया!’**च्या जयघोषात चिमुकल्यांसह सर्वांनी मातीशी नाते जोडत सर्जनशीलतेचा मनमुराद आनंद घेतला. कार्यशाळेदरम्यान आदरणीय प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वांना शेंगदाणा चिक्की देण्यात आली.




