साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड उत्साहात संपन्न १२० विद्यार्थिनींचा सहभाग; हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचा संदेश, मान्यवरांकडून वाचन संस्कृतीचा जागर
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड उत्साहात संपन्न
१२० विद्यार्थिनींचा सहभाग; हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचा संदेश, मान्यवरांकडून वाचन संस्कृतीचा जागर
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा मंगळवार (दि. १४ जुलै २०२६) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. हिंदी भाषेबद्दल विद्यार्थिनींमध्ये आवड निर्माण करणे, भाषिक कौशल्यांचा विकास घडविणे आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींचे कौतुक करताना सांगितले की, शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग हा शाळेसाठी अभिमानास्पद असून, अशा परीक्षांमुळे हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराला चालना मिळत आहे. विद्यार्थिनींनी अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत आपले ज्ञान समृद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे अँड. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थिनींना दररोज महान व्यक्तींच्या चरित्रातील किंवा प्रेरणादायी पुस्तकातील किमान १५ पाने वाचण्याचा तसेच आठवड्यातून एक पुस्तक पूर्ण करून त्यातील विचार आत्मसात करण्याचा मौलिक सल्ला दिला. नियमित वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासासह स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी दूरध्वनीद्वारे प्रताप महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. प्रा. कुमावत यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत भविष्यात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आत्मविश्वासाने सहभागी होण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व स्पष्ट करून अशा ऑलिम्पियाड परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेचा विकास होत असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाचे विशेष कौतुक केले.
या परीक्षेसाठी एकूण १२० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.
परीक्षेसाठी हिंदी शिक्षक दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ शिक्षक जे. एस. पाटील, आर. एम. देशमुख, मुकेश पाटील आणि दीपक महाजन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले, तर मुकेश पाटील यांनी आभार मानले.


