३३ वर्षांच्या ज्ञानदानाच्या तपश्चर्येला विराम; आदर्श शिक्षक आर. एस. पाटील सेवानिवृत्त , प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विनाअनुदानित सेवेतून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित; शहापूरच्या कर्मभूमीला लाभलेले विद्यार्थीप्रिय, गणित-विज्ञानाचे अभ्यासू शिक्षक
1 min read

३३ वर्षांच्या ज्ञानदानाच्या तपश्चर्येला विराम; आदर्श शिक्षक आर. एस. पाटील सेवानिवृत्त , प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विनाअनुदानित सेवेतून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित; शहापूरच्या कर्मभूमीला लाभलेले विद्यार्थीप्रिय, गणित-विज्ञानाचे अभ्यासू शिक्षक

Loading

३३ वर्षांच्या ज्ञानदानाच्या तपश्चर्येला विराम; आदर्श शिक्षक आर. एस. पाटील सेवानिवृत्त

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विनाअनुदानित सेवेतून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित; शहापूरच्या कर्मभूमीला लाभलेले विद्यार्थीप्रिय, गणित-विज्ञानाचे अभ्यासू शिक्षक

अमळनेर प्रतिनिधी : प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, संघर्षमय सुरुवातीचा काळ आणि विनाअनुदानित सेवेत अनेक वर्षे केलेली निस्वार्थ मेहनत… या सर्व आव्हानांवर स्वाभिमान, जिद्द, सहनशीलता आणि ज्ञानाची कास धरत तब्बल ३३ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आदर्श शिक्षक श्री. रविंद्र शंकर पाटील (आर. एस. पाटील सर) आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनप्रवासाला उजाळा मिळत आहे.
लासूर येथील धार्मिक, सेवाभावी आणि आध्यात्मिक संस्कारांचा वारसा लाभलेल्या वैकुंठवासी ह. भ. प. शंकर भिका सोनवणे यांच्या संस्कारक्षम कुटुंबात पाटील सरांची जडणघडण झाली. त्यांच्या वडिलांनी लासूर येथे अत्यल्प मोबदल्यात शिवणकामाचा व्यवसाय करत असतानाही गावातील आध्यात्मिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जपण्यासाठी सप्ताह, अभंग, ओव्या, टाळ-मृदुंगाच्या माध्यमातून जनमानसात आध्यात्मिक जागृती निर्माण करण्याचे पुण्यकर्म केले. याच संस्कारांची शिदोरी पुढील पिढीला लाभली.

संघर्षातून घडलेले ‘नाना’…

१९८०-९० च्या दशकातील प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही खासगी क्लासचा आधार नसताना स्वयंअध्ययनाच्या बळावर उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या आर. एस. पाटील सरांनी गणित विषयात पदवी तसेच चोपडा येथे शिक्षणशास्त्राचे प्रमाणपत्र प्राप्त केले. रोजगाराच्या शोधात असताना त्यांनी १९९२ पासून ज्ञानदानाची वाट धरली.

सुरुवातीला करमाड येथे एक वर्ष विनाअनुदानित तत्त्वावर सेवा बजावल्यानंतर १९९५ पासून एकात्मता माध्यमिक विद्यालय, शहापूर, ता. अमळनेर येथे त्यांनी अध्यापनास सुरुवात केली. या काळात तब्बल सहा-सात वर्षे विनावेतन सेवा स्वीकारूनही त्यांनी आपल्या कार्यातील प्रामाणिकपणा आणि एकाग्रता कधीही कमी होऊ दिली नाही.
काटकपणा, स्वावलंबन, सहनशीलता आणि स्वाभिमान या गुणांच्या जोरावर त्यांनी संघर्षाची प्रत्येक पायरी पार केली. त्यामुळेच गणित व विज्ञान विषयाचे अभ्यासू, आदर्श आणि विद्यार्थीप्रिय ज्येष्ठ शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

मुख्याध्यापकपद हुकले, मात्र मनातील मोठेपण कायम राहिले!

सेवाकाळातील एका वर्षाच्या सेवा खंडामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी मुख्याध्यापक पदापासून ते वंचित राहिले. मात्र या गोष्टीची कोणतीही खंत न बाळगता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून मिळालेला आदर आणि प्रेम हेच आपल्या सेवाकार्याचे खरे समाधान मानले. स्टाफमध्ये सहकार्यशील, मार्गदर्शक, सौजन्यशील आणि आपुलकीचा स्वभाव असलेले ‘नाना’ म्हणून ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून राहिले.
त्यांच्या अध्यापनातून घडलेले असंख्य विद्यार्थी आज शिक्षक, विविध व्यवसाय, शासकीय सेवा तसेच उच्च पदांवर कार्यरत आहेत. गणितासारखा विषय सोपा, सरळ आणि समजण्यास सुलभ करून शिकविण्याची त्यांची हातोटी विद्यार्थ्यांच्या मनात आजही कायम आहे.

सौ. कल्पना ताईंची संघर्षातील मोलाची साथ

पाटील सरांच्या या संघर्षमय प्रवासात त्यांच्या अर्धांगिनी सौ. कल्पना ताई यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे राहिले. लासूर येथील सुसंस्कृत व शिक्षक कुटुंबातील, पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कल्पना ताईंनी पतीच्या विनावेतन सेवाकाळात अनेक चढ-उतारांना सामोरे जात शहापूर येथे रोजगार व शेतीकामातून संसाराला हातभार लावला.
पतीच्या ज्ञानदानाच्या ध्येयाला साथ देत त्यांनी कुटुंबाचा संसार सांभाळला. घरातील आध्यात्मिक संस्कारांची परंपराही त्यांनी पुढे चालवली. सद्गुरू समर्थांच्या निरुपणातून आध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्याचे कार्य त्या आजही श्रद्धेने करीत आहेत.

श्रम + साधना = साध्य’ या विचाराचा आदर्श प्रवास

शहापूर ही पाटील परिवाराची कर्मभूमी ठरली. भाड्याच्या वास्तूत राहूनही ग्रामीण संस्कृतीशी नाते जपत, गावातील नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांच्या सुख-दुःखात सहभागी होत या परिवाराने आपलेपणा आणि सौजन्याची नाळ घट्ट जपली.
‘श्रम + साधना = साध्य आणि परोपकार’ या तत्त्वावर वाटचाल करणाऱ्या पाटील परिवाराच्या या प्रवासाला आज यशाची सुंदर किनार लाभली आहे. त्यांची कन्या सौ. जागृती व जावई उच्चशिक्षित असून वैवाहिक जीवनात स्थिरस्थावर आहेत.

ज्ञानदानाच्या ३३ वर्षांच्या प्रवासाला भावपूर्ण निरोप

अमळनेर येथील सुरभी कॉलनीत वास्तव्यास असलेले आर. एस. पाटील सर यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल ३३ वर्षे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी समर्पित केली. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा देत त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करणारे पाटील सर आज वयाच्या ५८व्या वर्षी शासकीय नियमानुसार सेवेतून निवृत्त होत आहेत.
त्यांच्या सेवानिवृत्तीचा हा क्षण केवळ एका शिक्षकाच्या सेवेला पूर्णविराम देणारा नसून, संघर्षातून उभे राहून ज्ञानदानाला जीवनाचे ध्येय मानणाऱ्या एका आदर्श शिक्षकाच्या तपश्चर्येला मिळालेली सन्मानाची पावती आहे.
“ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे…” या भावनेप्रमाणे लासूरच्या संस्कारभूमीतून आलेल्या या परिवाराने शहापूरच्या कर्मभूमीत प्रेम, सेवा, संस्कार आणि ज्ञानाचे बीज रुजविले.
पाटील सरांच्या सेवानिवृत्तीनंतरचा काळ सुख, शांती, आनंद, मंगलमय कौटुंबिक जीवन आणि निरामय आरोग्याने परिपूर्ण जावो; त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच प्रभूचरणी मनःपूर्वक प्रार्थना!

शब्दांकन
ईश्वर आर महाजन
पत्रकार अमळनेर
9860352960

सेवानिवृत्त शिक्षक आर एस पाटील सर यांच्या सेवा प्रतिबद्दल काही विद्यार्थी यांच्या बोलक्या प्रतिक्रिया…

१)

आदर्श शिक्षकाला मनःपूर्वक सलाम!

आदरणीय आर. एस. पाटील सर म्हणजे ज्ञान, शिस्त आणि साधेपणाचा सुंदर संगम!
आपले कार्य केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता अनेक पिढ्या घडविण्याचे महान कार्य ठरले. वर्गात आपण विज्ञान सोपे केले, तर आपल्या सहवासातून जीवनाचे धडे मिळाले.

आपल्या सेवापूर्ती व निरोप समारंभानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले पुढील आयुष्य सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि आनंदाने भरलेले जावो, हीच सदिच्छा!

शुभेच्छुक :
श्री. धीरज पवार व सौ. स्वाती पवार
संचालक – ज्ञानदा सायन्स क्लासेस, अमळनेर

2)
“आपल्या सेवानिवृत्तीची बातमी ऐकून मन हेलावले. एकात्मता विद्यालयात निर्माण होणारी आपली पोकळी भरून निघणे कठीण आहे. गणितावरील प्रभुत्व, विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम आपल्यात आहे.”

शाळेच्या सुरुवातीच्या संघर्षकाळात शेजारी असल्याने आपला प्रवास जवळून पाहिला आहे. सौ. कल्पना ताईंनी पगार नसतानाही केलेली शेतमजुरी आणि दिलेली खंबीर साथ आजही स्मरणात आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली; मात्र आपला साधेपणा, नम्रता आणि माणुसकी कधीच बदलली नाही—हीच आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची खरी पावती आहे.
शिक्षक पदाला आपण दिलेला न्याय निश्चितच आदर्शवत आहे. आपल्यासारखा शिक्षक लाभणे हे आमचे भाग्य! गौरेश्वर भगवान आपल्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, सुख-समाधान व दीर्घायुष्य देवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

– डॉ. दिगंबर पाटील, शहापूर
आदर्श विद्यार्थी

3)

सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा सर!

आदरणीय आर. एस. पाटील सर,
आपण आम्हाला केवळ गणित शिकवले नाही, तर प्रेम, आपुलकी, आत्मविश्वास आणि जीवनाची योग्य दिशा दिली. ‘आपले पाटील सर’ ही ओळख असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहील.
आपल्यासारखा प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ व विद्यार्थीप्रिय शिक्षक लाभणे हे आमचे भाग्य आहे. सेवापूर्तीनंतरचे आयुष्य उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि आनंदाने भरलेले जावो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

आपला विद्यार्थी –
नंदकिशोर सुभाष पाटील, शहापूर

सेवानिवृत्त शिक्षक आर एस पाटील यांचे काही
क्षणचित्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *