टीईटी रद्द करा; शिक्षकांची प्रलंबित कामे तातडीने निकाली काढा  शिक्षण उपसंचालक राठोड यांची शुभांगी पाटील यांच्याकडून भेट; संचमान्यता, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्याची कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी
1 min read

टीईटी रद्द करा; शिक्षकांची प्रलंबित कामे तातडीने निकाली काढा शिक्षण उपसंचालक राठोड यांची शुभांगी पाटील यांच्याकडून भेट; संचमान्यता, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्याची कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Loading

टीईटी रद्द करा; शिक्षकांची प्रलंबित कामे तातडीने निकाली काढा

शिक्षण उपसंचालक राठोड यांची शुभांगी पाटील यांच्याकडून भेट; संचमान्यता, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्याची कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी

धुळे प्रतिनिधी :
राज्यातील कार्यरत शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करत टीईटी (Teacher Eligibility Test) परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला आता अधिक धार आली आहे. राज्यभर सुरू असलेल्या शाळाबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी नाशिक येथे नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री. राठोड यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.

भेटीदरम्यान शुभांगी पाटील यांनी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत, नोकरीवर कार्यरत शिक्षकांना पुन्हा टीईटी परीक्षा देण्याची सक्ती ही अन्यायकारक असून, यामुळे हजारो शिक्षकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षा रद्द करण्याची मागणी शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, अशी विनंती त्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली.
यावेळी त्यांनी नाशिक विभागातील अनेक शिक्षक, कर्मचारी, शाळा व संस्थांची विविध प्रशासकीय कामे शिक्षण उपसंचालक कार्यालयात दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. एसआयटी चौकशीमुळे काही कामे रखडली असली, तरी ज्या संस्था व शाळांचा चौकशीशी कोणताही संबंध नाही आणि ज्यांची प्रकरणे नियम व कायद्याच्या चौकटीत आहेत, त्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी त्यांनी केली.
विशेषतः संचमान्यता, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता, सेवा सातत्य यांसारख्या अत्यावश्यक कामांमध्ये होणाऱ्या विलंबामुळे शिक्षक, कर्मचारी आणि संस्थाचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पात्र प्रकरणांवर त्वरित निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भदाणे, संस्थाचालक संजय अण्णा भामरे, ॲड. विवेक सूर्यवंशी, मोहन अहिरे, पाटील सर तसेच संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक आणि संस्थाचालक उपस्थित होते. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *