समुपदेशन क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याला संशोधनाची सुवर्णमुद्रा; ज्येष्ठ शिक्षिका स्मिता शिपूरकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी
![]()
समुपदेशन क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याला संशोधनाची सुवर्णमुद्रा; ज्येष्ठ शिक्षिका स्मिता शिपूरकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी
‘व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता व समायोजनावर होणारा परिणाम’ या विषयावरील संशोधनाला मान्यता; शिक्षण, समुपदेशन व करिअर मार्गदर्शन क्षेत्रात नवा मानाचा टप्पा
संभाजीनगर प्रतिनिधी(मुरलीधर बेडगे)
एच. के. गिडवाणी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुलुंड येथील ज्येष्ठ शिक्षिका व समुपदेशक डॉ. स्मिता शिपूरकर यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी (विद्यावाचस्पती) पदवी जाहीर झाली आहे. ‘A Study of Effectiveness of Perceptual Vocational Guidance Programme on Students’ Intelligence and Adjustment’ या संशोधन विषयावर त्यांनी डॉ. सुनिता लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी संशोधन पूर्ण केले. लवकरच विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
सुमारे ३५ वर्षे अध्यापन क्षेत्रात आणि २२ वर्षांहून अधिक काळ समुपदेशन क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या डॉ. शिपूरकर यांनी विद्यार्थ्यांचे करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन, वर्तन समस्या आणि शैक्षणिक समुपदेशन या क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी अडीच हजारांहून अधिक करिअर मार्गदर्शन व्याख्याने घेतली असून महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, आसाम, भोपाळ, इंदूर आदी राज्यांमध्येही समुपदेशन व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे.
डॉ. शिपूरकर या एससीईआरटी, पुणे यांच्या राज्यस्तरीय अभ्यासक्रम विकास समितीवर कार्यरत असून अनेक शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून योगदान देत आहेत. राष्ट्रीय ‘मनोदर्पण’ समुपदेशन हेल्पलाईनवर त्या प्रमाणित समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. तसेच एसीसी, सिएट, जिंदल यांसारख्या नामांकित उद्योगसमूहांसाठीही त्यांनी व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम घेतले आहेत.
त्यांनी बी.ए., एम.ए. (मराठी, मानसशास्त्र, शिक्षण, शिक्षण संप्रेषण), एम.एड., एम.फिल. यांसह मार्गदर्शन, समुपदेशन, शालेय व्यवस्थापन, बाल मानसशास्त्र, करिअर काउन्सिलिंग आदी विषयांतील अनेक पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. विविध शैक्षणिक वृत्तपत्रे, मासिके व स्मरणिकांमधून त्यांचे करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मानसिक आरोग्यावरील लेख नियमित प्रकाशित होत असतात.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार-२०२४’, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लबचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, शिक्षण महाश्री, शिक्षकरत्न, आदर्श शिक्षिका, सावित्रीबाई फुले समाजभूषण, राष्ट्रीय गौरव पुरस्कार, गुरुद्रोणाचार्य बेस्ट टीचर अवॉर्ड यांसह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच World Book of Records (UK) आणि London Certification Career Counselling Foundation कडूनही त्यांना विशेष सन्मान प्राप्त झाला आहे.
डॉ. स्मिता शिपूरकर यांना पीएचडी पदवी जाहीर झाल्याबद्दल स्वराज्य देशा टीमचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर बेडगे, रुपाली पाटील, विशाखा रुपल, व्यंकट होनाळे, गोपाळ हालसे, मनीषा बेडगे आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे शिक्षण व समुपदेशन क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

