साचलेल्या पाण्यावर आरोग्य विभागाचा प्रहार; अमळनेरमध्ये गप्पी मासे व औषध फवारणी मोहीम
![]()
साचलेल्या पाण्यावर आरोग्य विभागाचा प्रहार; अमळनेरमध्ये गप्पी मासे व औषध फवारणी मोहीम
अमळनेर प्रतिनिधी
आज (दि. १० जुलै २०२६) अमळनेर शहरात डेंगू व हिवताप प्रतिबंधासाठी व्यापक विशेष मोहीम राबविण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी गप्पी मासे सोडणे, ऑबेट टाकणे, ऑईल बॉल व ऑईलचा वापर करण्यात आला.
ही मोहीम जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार राबविण्यात आली असून, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. शेलकर, आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे, आरोग्य निरीक्षक किशोर माळी व अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरभर प्रभावीपणे काम केले.
या मोहिमेत १४ विशेष पथके, ४३ आशा वर्कर्स, सर्व आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध परिसरांची पाहणी केली. डासांच्या अळ्यांची वाढ होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. तसेच नागरिकांनाही घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, कुलर, टाक्या, टायर, मडक्यांसह इतर भांड्यांची नियमित स्वच्छता ठेवणे आणि डेंगू-हिवताप प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आदेशान्वये राबविण्यात आली असून, पावसाळ्यात डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा मोहिमा अधिक प्रभावी ठरतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

