गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला संतोषी माता ट्रस्टचा हातभार; आदर्श माध्यमिक विद्यालयात ४८ डझन वह्यांचे वाटप, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण
![]()
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला संतोषी माता ट्रस्टचा हातभार; आदर्श माध्यमिक विद्यालयात ४८ डझन वह्यांचे वाटप
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण
धुळे | प्रतिनिधी
धुळे येथील उद्यानपंडित बापूसाहेब माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, दोंदे कॉलनी, देवपूर येथे संतोषी माता ट्रस्ट, धुळे यांच्या वतीने होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी ४८ डझन वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
संतोषी माता ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे विश्वस्त आदरणीय हरीशचंद्र रेंडे (माळी साहेब) होते. प्रमुख अतिथी म्हणून ट्रस्टचे विश्वस्त डॉ. विजय चौरसिया तसेच अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष विलासराव पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी ट्रस्टने गरजू विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्नेहवस्त्र देऊन स्वागत केले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विलासराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील वह्यांचे महत्त्व समजावून सांगत सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. डॉ. विजय चौरसिया यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य, संतुलित जीवनशैली आणि नियमित अभ्यास याविषयी मार्गदर्शन करत शिक्षणासोबत उत्तम आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात हरीशचंद्र रेंडे यांनी संतोषी माता ट्रस्टच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. आदर्श माध्यमिक विद्यालयाची निवड योग्य ठरल्याचा विश्वास व्यक्त करत भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ट्रस्टकडून सातत्याने सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख संगीता चौधरी यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षिका ललिता रायते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस बळ देणारा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरला.

