नागरिकांसाठी उपनगराध्यक्षांचे कार्यालय खुले!, प्रथमेश शिरीषदादा चौधरी दर सोमवार ते शुक्रवार प्रत्यक्ष भेटणार; समस्या, सूचना व तक्रारींवर तातडीने पाठपुरावा
![]()
नागरिकांसाठी उपनगराध्यक्षांचे कार्यालय खुले!
प्रथमेश शिरीषदादा चौधरी दर सोमवार ते शुक्रवार प्रत्यक्ष भेटणार; समस्या, सूचना व तक्रारींवर तातडीने पाठपुरावा
नंदुरबार | प्रतिनिधी
नागरिकांच्या समस्या वेळेत जाणून घेऊन त्यांचे प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने नंदुरबार नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश शिरीषदादा चौधरी यांनी एक महत्त्वपूर्ण लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत ते दर सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी नियमितपणे उपलब्ध राहणार आहेत.
या उपक्रमामुळे नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था, विविध नागरी सुविधा, शासकीय कामांतील अडचणी तसेच विकासकामांबाबतच्या सूचना थेट उपनगराध्यक्षांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारी व मागण्यांवर संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांनी दिली.
यावेळी त्यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, आपल्या समस्या, अडचणी किंवा सूचना घेऊन सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत उपनगराध्यक्ष कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी. नागरिकांच्या प्रश्नांचे तातडीने व प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनासोबत सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
“जनतेशी थेट संवाद आणि समस्यांचे जलद निराकरण” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात येणारा हा उपक्रम नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार असल्याची भावना शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.

