अमळनेर-चोपडा नागरिकांसाठी ‘जनसमाधान बैठक’; ९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली थेट तक्रार निवारण
1 min read

अमळनेर-चोपडा नागरिकांसाठी ‘जनसमाधान बैठक’; ९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली थेट तक्रार निवारण

Loading

अमळनेर-चोपडा नागरिकांसाठी ‘जनसमाधान बैठक’; ९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली थेट तक्रार निवारण

प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी व नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर जलद व कालबद्ध निराकरण; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर उपविभागातील अमळनेर व चोपडा तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या, दैनंदिन प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी आणि तक्रारींचे स्थानिक स्तरावरच जलद, समन्वयपूर्ण व कालबद्ध निवारण व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जळगाव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘जनसमाधान बैठक’ या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, इंदिरा भवन, स्टेट बँकेच्या मागे, अमळनेर येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत अमळनेर व चोपडा तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या विविध प्रशासकीय अडचणी व तक्रारी थेट मांडण्याची संधी उपलब्ध होणार असून संबंधित विभागांच्या समन्वयातून त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी अमळनेर व चोपडा तालुक्यातील नागरिकांनी या जनसमाधान बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सूचना : लोकशाही दिन, माहितीचा अधिकार, भ्रष्टाचार निर्मूलन समितीसमोरील अर्ज, न्यायालयीन किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या, सेवाविषयक बाबी तसेच वैयक्तिक माहिती मिळविण्यासंदर्भातील अर्ज या बैठकीत स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *