वार्धक्यात भीक मागण्याची वेळ; मुसळधार पावसात शिक्षकांचा आक्रोश, आझाद मैदान हादरले!” , ‘जुनी पेन्शन आमचा हक्क, भीक नव्हे’ – आसमानी संकटावर मात करत हजारो शिक्षक-कर्मचाऱ्यांचा निर्धार; मंत्री गिरीश महाजन, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सुधाकर अडबाले व विक्रम काळे यांनी दिला न्यायाच्या लढ्याला पाठिंबा
![]()
“वार्धक्यात भीक मागण्याची वेळ; मुसळधार पावसात शिक्षकांचा आक्रोश, आझाद मैदान हादरले!”
‘जुनी पेन्शन आमचा हक्क, भीक नव्हे’ – आसमानी संकटावर मात करत हजारो शिक्षक-कर्मचाऱ्यांचा निर्धार; मंत्री गिरीश महाजन, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सुधाकर अडबाले व विक्रम काळे यांनी दिला न्यायाच्या लढ्याला पाठिंबा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
“आयुष्यभर समाज घडविला… हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळविले… पण आज स्वतःच्या वार्धक्याच्या सुरक्षिततेसाठी हातात कटोरा घेऊन सरकारकडे भीक मागण्याची वेळ आली,” या वेदनादायी भावनेने महाराष्ट्रातील हजारो पेन्शनग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोमवारी मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर एकवटले. मुसळधार पाऊस, वाहतूक विस्कळीत, रेल्वे बंद, चिखल आणि गैरसोयींची पर्वा न करता राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आंदोलकांनी ‘भीक मांगो’ आंदोलनातून शासनाला जाब विचारला.
अतिवृष्टीमुळे पुणे येथे रेल्वे आणि बस सेवा ठप्प झाल्यानंतरही आंदोलनाचा निर्धार ढळला नाही. पुणे रेल्वे स्थानकावर शिक्षक आमदार विक्रम काळे यांना घेराव घालत आंदोलकांनी हातात कटोरा घेऊन जुन्या पेन्शनची भीक मागितली. हा आक्रोश पाहून विक्रम काळे भावूक झाले आणि “जुनी पेन्शन मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही,” अशी ग्वाही दिली.
आझाद मैदानावरही पावसाच्या धारांमध्ये वार्धक्याशी झुंज देणारे अनेक निवृत्त शिक्षक घोषणांनी मैदान दणाणून सोडत होते. “आमच्या जगण्याचा आधार कोण?” असा हृदयद्रावक सवाल करत त्यांनी आमदार मनीषा कायंदे यांच्याकडे निवेदन सादर केले.
आंदोलनाला भेट देत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी येत्या दहा ते पंधरा दिवसांत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर तातडीची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. “मीही तुमच्यातलाच एक पेन्शनग्रस्त आहे; जुनी पेन्शन मिळेपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलनस्थळी भेट देत संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांच्याकडून निवेदन स्वीकारले. “सर्व पुरावे सादर करा; मुख्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक घेऊन न्याय देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करेन,” असे आश्वासन त्यांनी दिल्याने आंदोलनाला आशेचा नवा किरण मिळाला.
शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनंतरही पेन्शनप्रश्नी होत असलेल्या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज्यातील विविध भागांतून आलेल्या हजारो शिक्षक-कर्मचाऱ्यांनी अतोनात गैरसोयी, पाऊस आणि प्रवासातील अडथळे सहन करत हा लढा सुरू ठेवला. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांच्या नेतृत्वाखालील हा संघर्ष आता अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
“आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मावळे आहोत… जुनी पेन्शनचा गड जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” या निर्धारपूर्ण घोषणेने आझाद मैदान दणाणून गेले.



