शुद्ध पाण्याकडे अमळनेरची वाटचाल; जलकुंभ स्वच्छता मोहिमेला वेग! पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी पाळला दिलेला शब्द; तांबेपुरा जलकुंभापासून पुढे संपूर्ण शहरातील जलकुंभ स्वच्छ करण्याचा निर्धार
![]()
शुद्ध पाण्याकडे अमळनेरची वाटचाल; जलकुंभ स्वच्छता मोहिमेला वेग!
पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी पाळला दिलेला शब्द; तांबेपुरा जलकुंभापासून पुढे संपूर्ण शहरातील जलकुंभ स्वच्छ करण्याचा निर्धार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेला जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) स्वच्छतेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शहरवासीयांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने नगरपरिषदेकडून जलकुंभ स्वच्छता मोहिमेला वेग देण्यात आला असून, या उपक्रमाचे नेतृत्व नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील करत आहेत.
मागील आठवड्यात कोर्टमागील जलकुंभाची यशस्वी साफसफाई पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आता तांबेपुरा जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व जलकुंभांची साफसफाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभदायी
शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे या मोहिमेला आवश्यक गती मिळाल्याचे बोलले जात आहे.
नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांचा ‘आरोग्य प्रथम’ दृष्टिकोन
लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलकुंभ स्वच्छता मोहिमेला तातडीने मंजुरी दिली. शहरात शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना देत या उपक्रमाला चालना दिली.
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे प्रभावी नियोजन
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहराचा नियमित पाणीपुरवठा अबाधित ठेवत जलकुंभ स्वच्छतेचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केले आहे. कामाचा दर्जा, वेळेचे नियोजन आणि प्रत्यक्ष देखरेख यामुळे ही मोहीम प्रभावीपणे पुढे जात असल्याचे दिसून येत आहे.
सभापती कैलास पाटील यांनी दिलेला शब्द केला पूर्ण
पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील जलकुंभ स्वच्छ करण्याचे आश्वासन देणारे पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी ते प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या जलकुंभांची साफसफाई सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी सभापती कैलास पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त करत, “काम असावे तर असे!” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शुद्ध पाण्याकडे शहराची वाटचाल
जलकुंभ स्वच्छता मोहिमेमुळे पाण्यातील गाळ, साचलेली घाण आणि संभाव्य जंतूंचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. शहरातील सर्व जलकुंभांची नियमित साफसफाई पूर्ण झाल्यानंतर अमळनेरकरांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

