कपड्याइतकंच चारित्र्यालाही जपणारे,* *शिस्तप्रीय प्राचार्य डॉ. ए. जी. सराफ :*
1 min read

कपड्याइतकंच चारित्र्यालाही जपणारे,* *शिस्तप्रीय प्राचार्य डॉ. ए. जी. सराफ :*

Loading

*कपड्याइतकंच चारित्र्यालाही जपणारे,*
*शिस्तप्रीय प्राचार्य डॉ. ए. जी. सराफ :*
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””
जीवन जगतांना काही माणसं आपल्या व्यक्तिमत्त्वाने, कर्तुत्वाने आणि वागण्या बोलण्याने समाजावर आपली स्वतःची छाप उमटवतात. जी अमिट असते. अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर ए.जी.सराफ त्यातलेच एक. “शाम पायाला माती लागू नये म्हणून इतका जपतोस, तसं मनालाही घाण लागू नये याची काळजी घे हं !” असा संदेश श्यामच्या आईने श्यामला दिला होता. हाच संदेश आपल्या जीवनाचा मूलमंत्र करून डॉ. सराफ यांनी आयुष्यभर जपला. अंगावर स्वच्छ पांढरा शुभ्र पेहराव आणि निर्मळतेचा वसा घेऊन सर अंतिम क्षणापर्यंत वावरले. त्यांनी प्रताप महाविद्यालयासारख्या शिक्षण पंढरीत प्राचार्य पदाची धुरा सांभाळतांना आपल्या कपड्यावर आणि चारित्र्यावर कधीही डाग लागू दिला नाही. अशी माणसं समाजामध्ये फार थोडी असतात. त्यांच्या निघून जाण्याने समाजात एक प्रकारची पोकळी निर्माण होते. अशीच पोकळी अमळनेर सह खान्देशात दि. १८ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री ८वा. प्राचार्य डॉ. सराफसरांच्या निर्वाणाने निर्माण झाली आहे.

मी अकरावी सायन्स चे शिक्षण पूर्ण करून बारावी विज्ञान शाखेत प्रताप महाविद्यालयात दाखल झालो तेव्हा मी सर्वप्रथम प्राचार्य डॉ. ए. जी. सराफ यांना पाहिले. अंगावर पांढरा शुभ्र इनशर्ट केलेला पोशाख. त्यावर एक जॅकेट. डोळ्यांवर गाॅगल, स्कूटरवर पांढरा शुभ टर्कीश रुमाल टाकून त्यावर विराजमान झालेले तेजपुंज व्यक्तिमत्व जेव्हा प्रताप महाविद्यालयात प्रवेश करायचे तेव्हा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागापासून ते ऑफिस पर्यंत “सर आले, सर आले, टिनोपॉल सर आले !” असे इशारे, खाणाखुणा विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये होत असत आणि क्षणार्धात प्राचार्य महाविद्यालयात आले आहेत याची चुणूक संपूर्ण महाविद्यालयावर पसरत असे. इतका त्यांच्या शिस्तीचा आदरयुक्त दरारा त्याकाळी महाविद्यालयात होता. सर भौतिक शास्त्राचे एम.एस.सी. आणि डॉक्टरेट झालेले होते. त्याकाळी त्यांच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा आणि शिस्तिचा डंका पुणे विद्यापीठापर्यंत पोहचला होता. प्राचार्य पदावर असतानाही सरांनी कधीही आपल्या विभागाला अंतर दिले नाही. दिवसातून एकदा त्यांचा विभागात फेरफटका असायचाच. भौतिकशास्त्र विभागाला लागूनच असलेल्या मोठ्या हॉलमध्ये बारावीचा वर्ग भरायचा. सरांनी आमच्या वर्गावर अनेकदा तास घेतल्याचे स्मरते. ते वर्गात येण्याआधी वर्गात टाचणी पडली तरी ती ऐकू यावी इतकी शांतता पसरत असे. त्यांचे शिकवणं सुरू असताना विद्यार्थी तल्लीन होऊन मंत्रमुग्ध होत असत. त्यांच्या उपस्थितीत आणि वाणीत कमालीची जादू होती. त्यांच्या जवळ जाणे, त्यांच्याशी बोलणे आम्हाला स्वप्नवत वाटत असे. मी प्रताप महाविद्यालयात त्यानंतर एम. एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले परंतु एक-दोन वर्षातच सरांनी प्राचार्य पदाचा राजीनामा दिला होता. तरीही त्यांचं महाविद्यालयातील वावर तितक्याच शिस्तीचा होता. सरांच्या महाविद्यालयात येण्यावरून विद्यार्थी घड्याळी लावत असत, इतके ते काटेकोर होते !

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आणि मी शिक्षक म्हणून धरणगावात स्थायिक झालो. अमळनेर महाविद्यालयात गेल्यावर सरांच्या संदर्भातील अनेक दंतकथा अनेक वर्ष ऐकण्यात येत होत्या. त्यांनी महाविद्यालयासाठी घेतलेले परिश्रम आणि त्यांच्या शिस्तीच्या गप्पा हा प्रताप महाविद्यालयातील एक अलिखित नियमच झाला होता. सर निवृत्त झाल्यानंतर सरांनी स्वतःला मंगळ ग्रह मंदिर, पू. साने गुरुजी स्मारक आणि सेवानिवृत्त मित्र मंडळात स्वतःला गुंतवून घेतले होते. या ठिकाणीही त्यांनी आपल्या वागण्या बोलण्यात आणि शिस्तीत तसूभरही तडजोड केली नाही. ते आपल्या जीवनमूल्यांशी आणि तत्त्वांशी इमानदार रहात स्वतःच्या शैलीत आनंदात जगले

सर बालपणी प्रताप हायस्कूलमध्ये पू. साने गुरुजींचे विद्यार्थी होते. अमळनेर येथील जैन मंदिराजवळ त्यांची टोले जंग इमारत होती. याच इमारतीत मागच्या बाजूला पू. साने गुरुजी राहत असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले होते. साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी ते एक होते. गुरुजींचे सानिध्य त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर लाभले. त्यामुळेच त्यांच्यात गुरुजींसारखी तत्वनिष्ठता शिगोशीग भरलेली होती. महाविद्यालयीन जीवनात असताना सरांशी प्रत्यक्ष भेटण्याचा आणि त्यांनी मला ओळखण्याचा धुरान्वेयेही संबंध नव्हता परंतु त्यांनी माझ्या जीवनावर एक अदृष्य छाप सोडलेली होती. त्या ओढीने मी माझ्या निवृत्तीनंतर २०२२ साली मी त्यांना भेटायला गेलो. सोबत सन्मित्र भाऊसाहेब देशमुख होते. देशमुखांनी सरांना माझी जुजबी ओळख करून दिली. तेव्हा सर आनंदाने म्हणाले “अरे चौधरी, मी तुझे अनेक लेख वर्तमानपत्रात, दिवाळी अंकातून वाचले आहेत. विशेषता साने गुरुजींवर लिहिलेले तुझे लेख मला खूप भावले. खूप छान लिहतोस तू !” असे म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवत कौतुकाने आशीर्वाद दिले. तेव्हा माझ्या अंगावर मुठभर मास चढले होते. आपण ज्यांना आदर्श मानतो, ज्यांच्या जगण्यातला काही अंश आपल्या जगण्यात यावा यासाठी प्रयत्न करतो ते आपल्याला नावानिशी ओळखतात याचा मला झालेला आनंद अवर्णनीय होता. मी लेखक, कवी आहे याची दखल घेत सरांनी माझ्याशी दीड दोन तास लेखनावरच चर्चा केली. सरांनी साने गुरुजींवर त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांबद्दल एक पुस्तक लिहिले होते त्याची जन्मकथा त्यांनी मला सांगितली. या पुस्तकात आमच्या धरणगावातील स्व.बी.डी.पवार यांचाही समावेश केलेला आहे असे त्यांनी मला सांगितले. गुरुजींवर लिहिलेली त्यांची अनेक पुस्तके साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आणि होणार होती. याच ध्यासातून त्यांनी पू. साने गुरुजी स्मारकाचे संस्थापक म्हणून काम सुरू केले होते. दरवर्षी आपल्या निवृत्तीवेतनातील एक महिन्याचे वेतन त्यांनी शेवटपर्यंत स्मारकाला देणगी म्हणून दिल्याचे या भेटीत मला त्यांच्याकडून कळाले. मी श्रध्देने नतमस्तक झालो. किती ही आपल्या गुरुजींवर आढळनिष्ठा.! सरांना भेटलो तेव्हा मी त्यांचा सत्कार करून त्यांना माझा “बंधमुक्त” हा कवितासंग्रह भेट दिला होता. या कविता संग्रहातील कविता वाचून सरांनी माझ्याशी दीर्घवेळ फोनवर चर्चा केली होती. सरांचा निरोप घेताना सरांनी मलाही त्यांची काही पुस्तके भेट म्हणून दिली आणि त्यांच्या घरी घरातच तयार केलेला फाफडा आणि पेढा खाऊ घालून ही भेट अविस्मरणीय आणि गोड केली होती.

सरांची कार्यप्रवणता आणि उत्साह इतका होता की साहित्य संमेलनाच्या पहिल्या बैठकीलाही सर उपस्थित होते. सरांनी त्यात सहभागही नोंदविला होता. या बैठकीतही सरांशी माझ्या गाठीभेटी झाल्या. बोलणं झालं आणि त्यांच्या शब्दा शब्दातून मी समृद्ध होत गेलो. याच प्रसंगी प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय एस.आर.चौधरी यांच्याशीही माझी भेट झाली आणि हा दुर्मिळ योग जुळून आला. ज्या माणसांच्या वागण्या ,बोलण्यातून आणि कर्तृत्वातून इतिहास घडतो ती माणसं जगात अमर होतात. शरीराने ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेले कार्य आणि उभा केलेला आदर्श समाजामध्ये चिरंजीव राहतो. श्रद्धेय सराफ सर त्यापैकीच एक होते. आपल्या जिवंतपणीच ज्यांची दंतकथा झाली होती अश्या दिव्य आत्म्याला माझी विनम्र, भावपूर्ण श्रद्धांजली.! मी सरांचा विद्यार्थी होतो, याचा मला अभिमान वाटतो.

© *प्रा.बी.एन.चौधरी.*
देवरुप, धरणगाव.
(९४२३४९२५९३)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *