सराफ सर गेले; पण त्यांचा संस्कारांचा वारसा कायम सोबत राहील -दर्शना पवार कार्यवाह साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर
![]()
सराफ सर गेले; पण त्यांचा संस्कारांचा वारसा कायम सोबत राहील
-दर्शना पवार कार्यवाह
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर
“सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे” या विचाराप्रमाणे जगलेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली
अमळनेर प्रतिनिधी
शरीर थांबते , पण माणसानं आयुष्यभर कमवलेले बौद्धिक चिरकाल टिकते.. ती खरी कमाई असते. शहाणपणाचा साठा असतो जो पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देतो. ते शाश्वत मुल्य संस्कार , अनेक विद्यार्थी , कुटुंबात ,साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या कामात दिसतील हीच सरांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली…
सदा ते देतची जावे , जगाला प्रेम अर्पावे , या उक्तीप्रमाणे जगणारे आदरणीय प्राचार्य डॉ अरविंद सराफ सर आज आपल्याला सोडून गेले..
सर हजारों विद्यार्थ्यांना व साऱ्या अमळनेर ला काय देऊन गेले तर तो मुल्य संस्कारांचा ठेवा तो जोपासणे, जतन संवर्धन करण्याची जबाबदारी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान ची आपली सर्वांची आहे.
सर नेहमी म्हणायचे,तुम्ही मुलं हाती घेतलेले काम योग्य पद्धतीने पूर्ण करतात ते पुढच्या नव्या योग्य पिढीच्या हाती द्याल, ही मला खात्री आहे. शासनाची उदासीनता असली तरी तुमच्या सातत्याने पाठपुरावा प्रयत्न सुरू आहे , लोक सहभागातून स्मारक उभे राहते याचे मला समाधान आहे,हेच जास्त महत्त्वाचे आहे.
जन्म आहे तर मृत्यू आहेच , तो कोणालाही चुकत नाही. पण जगावे कसे याचा आदर्श काही लोक घालून जातात त्यापैकी एक नाव म्हणजे आदरणीय प्राचार्य डॉ अरविंद सराफ…
आयुष्याचा एक एक मिनिट समाजोपयोगी कामासाठी सर जगले , उत्तम शिक्षक तर होतेच, त्याच बरोबर सर उत्तम जोडीदार, आपल्या मुलांचे उत्तम पालक , उत्तम काका , उत्तम सामाजिक भान असलेले व्यक्ती , उत्तम मित्र, एखादे पद घेतले तर ते उत्तम रीत्या सांभाळणे , उत्तम खवय्ये , उत्तम वाचक , असे सर्व सरांचे व्यक्तिमत्त्व राहिले.
सर खुप कडक शिस्तीचे अशी सरांची ख्याती होती. पण माझा अनुभव कदाचित तुमच्या पेक्षा थोडा वेगळा , सर विनोद सांगून कधी कधी खळखळून हसवायचे तर कधी कधी करूणेने ओथंबून घडाघडा डोळ्यातून अश्रु गाळायचे, लहानबाळासारखं सर एखाद्याची गंमत पण करायचे. झाडांच्या विषयी बोलताना सर मात्र नेहमीच गंभीर असायचे.
वेळेची शिस्त सर काटेकोरपणे पाळायचे. कार्यक्रमा साठी सर उशिरा पोहचले असा अनुभव कदाचितच कोणाला असेल.
अहो अनेक वेळा निवृत्ती नंतर वेळ जात नाही असे म्हणत आयुष्याबद्दल कुरबुरी करत जगणारी माणसे पाहिली , की या वयातही ज्यांच्या कडे वेळ नाही एवढे कामात मग्न असलेले सराफ सर सर्वांना परिचित आहेत.
दोन पैसे मिळावेत म्हणून काम करावे लागते असा दृष्टीकोन ठेऊन जगतांना आपला कामातील आनंद पार निघून जातो. पण मृत्यू येईपर्यंत काम करत राहणे. त्या श्रमात आनंद शोधणे. समाजासाठी झटत राहणे. हा कामाकडे बघण्याचा सराफ सरांचा दृष्टीकोन भारावून टाकतो.
सर काम करतांना समाजाचे भले समाजातील लोकांचा समाजकल्याण चा विचार आधी करायचे , म्हणून त्यांनी हाती घेतलेल्या कामांना यश येत गेले. प्रताप काॅलेज ला लावलेले 1000 झाडे , ( ही झाडे लावतांना जगवण्यासाठी सरांची नियोजन होते एक झाड पाच विद्यार्थी आणि एक प्राध्यापक , त्या विद्यार्थी व शिक्षकाने त्या झाडांची काळजी घ्यायची , सर सांगतात काॅलेजला पाच शिपाई होते त्या सगळ्यांचे सराफ सरांवर एवढे प्रेम की संप सुरू असतांना देखील ते झाडांची देखरेख काॅलेजची सर्व कामे करत होती. सरांसोबत काॅलेजला फेरफटका मारला तर सर प्रत्येक झाडाचा इतिहास सांगायचे, सर स्वतः रविवारी ही काॅलेजला हजर रहात , सर काॅलेज ला असतांना एका झाडाचे पानाला हात लावण्याची देखील कोणाची हिमंत नव्हती.. जणू काही सर्व झाडे आईच्या कुशीत असल्यासारखे सुरक्षित होते. आपले प्राचार्य स्वतः शिस्त पाळतात म्हणून विद्यार्थी प्राध्यापक , शिपाई सर्वांना आपोआप शिस्त लागली. अनेक प्राध्यापक सरांचे विद्यार्थी म्हणतात सर म्हणजे नारळासारखे बाहेरून अतिशय कडक पण आतून एकदम गोड मनाला शांत करणारे ते
थंड पाणी , ) आणि त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी , विद्यार्थी म्हणतात सराफ सरांनी अनेकांचे आयुष्य बदलले , सतत कामात मग्न राहण्याची जे हाती घेतले ते चिकाटीने करण्याचा त्यांचा स्वभाव , त्यांचे वेळेचे नियोजन फार काटेकोर असायचे , सर कधीही उशीर करत नाही.
सरांचे पर्यावरण प्रेम वेळोवेळी जाणवते , जसे प्रताप काॅलेज मधील झाडे , मंगळग्रह मंदिर पायाभरणी करतांना व अंबाऋषी टेकडी तसेच साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे लावलेली झाडे देखील सरांचे पर्यावरण प्रेमाची साक्ष देतात. जमीन कोणती किती खत टाकायचे , कोणते झाड टिकेल , साधारण किती खड्डा करावा लागेल. मग पाणी देण्याचे नियोजन , झाड लावतांना फोटो काढण्यापेक्षा , झाड जगवण्यासाठी सरांचे प्रयत्न अधिक असतात.
साने गुरुजी स्मारक वर जायचे म्हटले की सर ठरलेल्या वेळेत परफेक्ट तयार असायचे , उलट मला उशीर झाला तर ओशाळवाणे वाटायच. सरांचा उत्साह बघून आमचा आनंद उत्साह द्विगुणित व्हायचा , अनेक संकटांना तोंड देत सर शेवटपर्यंत प्रचंड आशावादी होते. एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पुर्ण करेपर्यंत त्यांना चैन पडत नसे.
तुम्ही पर्यावरण प्रेमी , शिस्तप्रिय सराफ सर बघीतले पण, खवैयै सराफ सरांचा परीचय देखील आहे. सरांच्या घरून काहीच न खाता एकही व्यक्ती अजूनपर्यंत परत आलेला तुम्ही पाहीला नसेल. घरात मनिषा वहीनी नसतील तर सर चिक्की ,फरसाण तर कधी सुका मेवा असे काही तरी देणारच या दुकानातील खाद्यपदार्थाला चव असायची ती मनापासून खाऊ घालण्याच्या वृत्तीची.
पुस्तक भेट देणारे सराफ सर , हास्य क्लब मध्ये मनमोकळेपणाने हसणारे सराफ सर , मित्रांच्या मैफलीत रमणारे सर , कुटुंबावर प्रेम करणारे सराफ सर
डाॅ संदिप सराफ , मिलिंद सर , गौरी ताई , मंजूताई व सरांची नातवं यांच्याशी ज्या ज्या वेळी बोलणे झाले. ते सरांबद्दल बोलतांना त्यांची मने दाटून यायची .
आज कुटुंबातील सर्वांना अश्रू अनावर झाले. काकांनी लावलेली शिस्त आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कामात येईल ,
आमचे काका म्हणजे संस्कार आणि प्रेमाचे चालते बोलते पुस्तक होते.
डॉ संदीप म्हणतात वडील लहानपणी गेले पण काकांनी वडीलांची कमतरता भासू दिली नाही. आम्हाला घडवले, सर्व मुलांवर सारखे प्रेम केले. मिलिंद पेक्षा ही ते माझ्या वर जास्त प्रेम करतात. आम्ही सर्व भावंडे एकमेकांशी प्रेमाच्या धाग्याने बांधलेले आहोत. सर आमच्या घराचे अधिष्ठान आहेत. आम्ही हा धागा अधिक मजबूत करू…
सरांच्या शेवटच्या क्षणी सुद्धा पांढय्रास्वच्छ कपड्यांना कुटुंबा ने डाग पडू दिला नाही. आज त्यांच्या सुना मुली सरांना आवाज देताय , पण सर शांत आहेत..शेवटच्या क्षणापर्यंत कुटुंबातील लोकांनी सरांची काळजी घेतली. असे भरभरून प्रेम देणारे सर आज नाहीत.
दर्शना लवकर ये , आमची दर्शना घाबरत नाही कोणाला असे अभिमानाने मिरवणारे माझे प्रेरणास्थान आदरणीय प्राचार्य डॉ अरविंद सराफ सर , ते सांगायचे साने गुरुजी यांचा बालपणात मला लाभलेला सहवास ही माझ्या आयुष्यातील सर्वेश्रेष्ठ उपलब्धी आहे…
मानव हिताचा विचार पेरतांनाच्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या कामा निमित्त सरांचा मिळालेला सहवास, त्यांचं रागावणं, कौतुक करणं व मनापासून प्रेम करणं तसेच त्यांचा कामाकडे बघण्याचा दृष्टीकोन या साऱ्यातून सरांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहताना वाटते.
सर, तुम्ही कायम सोबत असाल.
आम्ही वारसा जपू- संवर्धित करु शिस्त, प्रामाणिकपणा व निर्भिडतेचा.
शब्दाकंन
दर्शना पवार
कार्यवाह
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर


