ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाला मिळाली पावती.., शशिकांत पाटील यांची विभागीय ग्रंथालय संघटनेवर निवड
![]()
ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाला मिळाली पावती..
शशिकांत पाटील यांची विभागीय ग्रंथालय संघटनेवर निवड
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शिरूड श्रीदत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दादासाहेब शशिकांत रघुनाथ पाटील यांची विभागीय ग्रंथालय संघटनेच्या सदस्यपदी निवड झाल्याने शिरूड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल शिरूड येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी तसेच गावातील सुजान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमधून ज्येष्ठत्वाच्या निकषावर झालेली त्यांची निवड ही त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची, अभ्यासू वृत्तीची आणि ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची पावती मानली जात आहे. यापूर्वीही त्यांनी जळगाव जिल्हा ग्रंथालय संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या कार्याचा ठसा ग्रंथालय क्षेत्रावर उमटला आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिरूड येथील वाचनालयाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. वाचकांसाठी अधिक चांगल्या सुविधा, विविध ज्ञानवर्धक उपक्रम आणि अभ्यासपूर्ण वातावरण निर्माण होण्यास या नेतृत्वाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दादासाहेब पाटील यांच्या ज्ञानसेवा आणि समाजसेवेचा प्रवास असाच यशस्वीपणे सुरू राहो तसेच भविष्यातही त्यांना अनेक मानाच्या पदांवर कार्य करण्याची संधी लाभो, अशा शुभेच्छा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आल्या.

