टीईटी : शिक्षक, शिक्षण, मानसिक तणाव  कार्यरत शिक्षकांच्या मानसिक छळाची वेदनादायी कहाणी
1 min read

टीईटी : शिक्षक, शिक्षण, मानसिक तणाव कार्यरत शिक्षकांच्या मानसिक छळाची वेदनादायी कहाणी

Loading

टीईटी : शिक्षक, शिक्षण, मानसिक तणाव

कार्यरत शिक्षकांच्या मानसिक छळाची वेदनादायी कहाणी

“आम्ही शिक्षक आहोत की आयुष्यभर परीक्षा देणारे परीक्षार्थी?” — आज महाराष्ट्रातील हजारो कार्यरत शिक्षकांच्या मनात हा प्रश्न अस्वस्थपणे घोंगावत आहे.

शिक्षक हा समाजाचा शिल्पकार, संस्कारांचा वाहक आणि राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. परंतु प्रत्यक्षात त्याच शिक्षकाला आज अशा परिस्थितीत उभे केले गेले आहे की, तो वर्गात विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, धैर्य आणि यशाचे धडे देत असताना स्वतः मात्र असुरक्षितता, मानसिक ताण आणि भविष्याच्या चिंतेने ग्रासलेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २०२८ पर्यंत कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, यात दुमत नाही. मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक वर्षांची सेवा, अध्यापनाचा अनुभव, विद्यार्थ्यांच्या घडणीत दिलेले योगदान आणि नियुक्तीच्या वेळी पूर्ण केलेल्या सर्व पात्रतांचा पुरेसा विचार झाला का, हा प्रश्न आज प्रत्येक शिक्षकाच्या मनात आहे.

आज १५, २०, २५ आणि अगदी ३० वर्षांपासून ज्ञानदान करणारे शिक्षक पुन्हा परीक्षा हॉलमध्ये बसण्यास भाग पाडले जात आहेत. नियुक्तीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या सर्व नियमांचे पालन करून, आवश्यक शैक्षणिक पात्रता व निवड प्रक्रिया पूर्ण करून सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना आज पुन्हा स्वतःची पात्रता सिद्ध करण्यास सांगितले जात आहे. त्यांच्या दशकांतील प्रामाणिक सेवेचे मूल्य नेमके काय?

याहून मोठा मानसिक छळ कोणता असू शकतो?

एका बाजूला नियमित अध्यापन, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, निकाल, विविध शासकीय अहवाल, ऑनलाइन पोर्टलवरील माहिती, जनगणना, एसआयआर, निवडणूक प्रक्रिया आणि असंख्य अशैक्षणिक कामांचा डोंगर; तर दुसऱ्या बाजूला टीईटीच्या अभ्यासाचे वाढते ओझे. दिवसभर शाळेत काम करून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणाऱ्या शिक्षकाची मानसिक अवस्था कोण समजून घेणार?

अनेक शिक्षक वृद्ध आई-वडिलांची सेवा करत आहेत, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत, आर्थिक ताण सहन करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर आणखी एका परीक्षेचे ओझे टाकणे कितपत न्याय्य आहे?

इतक्यावरच हा मानसिक छळ थांबत नाही. नियोजित टीईटी परीक्षेचा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना समोर येतात. लाखो शिक्षक अभ्यास करून, रजा घेऊन, मानसिक तयारी करून बसलेले असताना परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फुटल्याच्या बातम्या समोर येतात. त्यामुळे निर्माण होणारी निराशा, संताप आणि मानसिक खच्चीकरण याची जबाबदारी कोण स्वीकारणार? ही केवळ प्रशासकीय चूक नाही; हा प्रामाणिक शिक्षकांच्या विश्वासावर झालेला गंभीर आघात आहे.

याहूनही अधिक वेदनादायी बाब म्हणजे, टीईटीचा निकाल जाहीर होताच विविध प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये “टीईटीचा निकाल अवघा ४–५ टक्के!”, “९० टक्के गुरुजी नापास!” अशा ठळक मथळ्यांनी बातम्या प्रसिद्ध होतात. हे मथळे केवळ आकडेवारी सांगत नाहीत; ते हजारो शिक्षकांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर घाला घालतात.

हे मथळे पालक, विद्यार्थी आणि संपूर्ण समाज वाचत असतो. परिणामी विद्यार्थ्यांच्या मनात, “आपले सर नापास झाले… त्यांना काहीच येत नाही…” असा गैरसमज निर्माण होतो. पालकांचा विश्वास डळमळतो, विद्यार्थ्यांचा आदर कमी होतो आणि समाजात शिक्षकांविषयी अविश्वास व उपेक्षेची भावना वाढीस लागते.

ज्या शिक्षकाने आयुष्यभर विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, चारित्र्य आणि यशाचे धडे दिले, त्यालाच समाजासमोर अपयशी ठरविण्याची ही पद्धत योग्य म्हणता येईल का?

आपली संस्कृती “गुरुर्देवो भव” असे शिकवते. गुरूला देवतुल्य मानणाऱ्या या देशात शिक्षकाची प्रतिमा सातत्याने मलिन होत असेल, तर ती केवळ शिक्षकांची शोकांतिका नसून संपूर्ण समाजाच्या मूल्यव्यवस्थेच्या ऱ्हासाची धोक्याची घंटा आहे. शिक्षकाची प्रतिमा डागाळली की विद्यार्थ्यांच्या मनातील श्रद्धा कमी होते, शिक्षणाची गुणवत्ता प्रभावित होते आणि राष्ट्रनिर्मितीचाच पाया हादरतो.

आज शिक्षकांमध्ये नकळत अंतर्गत स्पर्धा आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शिक्षक उत्तीर्ण झाले, काही अपयशी ठरले. उद्या अपयशी शिक्षकांवर संस्था, प्रशासन आणि समाजाकडून मानसिक दबाव वाढला, तर त्याची जबाबदारी कोणाची?

खरा प्रश्न एवढाच आहे की, शिक्षकांनाच वारंवार स्वतःची पात्रता सिद्ध करण्याची वेळ का यावी? त्यांच्या अनुभवाचे, प्रामाणिक सेवेचे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात घडविलेल्या परिवर्तनाचे मूल्यमापन कोण करणार?

शिक्षक हा संशयित नाही; तो राष्ट्रनिर्माता आहे.

त्याच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याला सतत परीक्षा, अटी आणि असुरक्षिततेच्या भोवऱ्यात ढकलले, तर त्याचे परिणाम केवळ शिक्षकांपुरते मर्यादित राहणार नाहीत. मानसिक तणावाखाली असलेला शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास किती प्रभावीपणे रुजवू शकेल, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
आज गरज आहे ती शिक्षकांना मानसिक आधार देण्याची, त्यांच्या अनुभवाचा सन्मान करण्याची आणि कार्यरत शिक्षकांसाठी मानवी दृष्टिकोनातून न्याय्य व संवेदनशील धोरण आखण्याची.
शिक्षणव्यवस्थेची गुणवत्ता केवळ परीक्षा, निकाल किंवा प्रमाणपत्रांवर ठरत नाही; ती शिक्षकांच्या आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि मानसिक स्वास्थ्यावरही तितकीच अवलंबून असते. शिक्षकांचा सन्मान अबाधित ठेवणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

आज आवश्यकता आहे ती कार्यरत शिक्षकांवरील टीईटी सक्तीचा मानवी, न्याय्य आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून पुनर्विचार करण्याची. कारण शिक्षकाला संशयाच्या नजरेने नव्हे, तर विश्वासाच्या नजरेने पाहिले, तरच तो भावी पिढीला सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्राभिमानी नागरिक घडवू शकेल.

शिक्षकांना शिक्षा नव्हे, सन्मान हवा.
त्यांच्या अनुभवाला मान्यता हवी.
त्यांच्या सेवेला न्याय हवा.

कारण—
शिक्षक वाचला तर शिक्षण वाचेल.
शिक्षण वाचले तर समाज वाचेल.
आणि समाज वाचला तरच राष्ट्राचा भविष्यकाळ सुरक्षित राहील.

– श्री तुळशीराम तोताराम सोनवणे
उपशिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद.
समन्वयक, माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा.
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघ, जळगाव.
मो. ७७०९७२७८०८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *