अहिराणी साहित्याला विद्यापीठीन मान्यता; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या अनुवादाची अभ्यासक्रमात ऐतिहासिक निवड, ‘बा, तथागता (अहिराणी)’ या अनुवादित साहित्यकृतीचा प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेरच्या तृतीय वर्ष कला अभ्यासक्रमात समावेश; साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
अहिराणी साहित्याला विद्यापीठीन मान्यता; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या अनुवादाची अभ्यासक्रमात ऐतिहासिक निवड
‘बा, तथागता (अहिराणी)’ या अनुवादित साहित्यकृतीचा प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेरच्या तृतीय वर्ष कला अभ्यासक्रमात समावेश; साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर प्रतिनिधी : एरंडोल येथील ज्येष्ठ कवी, अनुवादक व साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. मानवतावादी विचारवंत तथा कवी प्रा. डॉ. म. सु. पगारे लिखित ‘बा, तथागता!’ या अडीचशे पानी कवितासंग्रहाचे प्रा. आंधळे यांनी केलेले ‘बा, तथागता (अहिराणी)’ हे अहिराणी भाषेतील भाषांतर प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ही साहित्यकृती अध्ययन-अध्यापनासाठी वापरली जाणार असून ‘भाषांतर मीमांसा (MAR-VSC-367)’ या अभ्यासपत्रिकेच्या सहाव्या सत्रात तिचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे अधिकृत पत्र नुकतेच अभ्यास मंडळाकडून प्रा. वा. ना. आंधळे यांना प्राप्त झाले असून त्यांच्या साहित्यसेवेचा हा मोठा सन्मान मानला जात आहे.
प्रा. आंधळे गेल्या चार दशकांपासून सातत्याने काव्यलेखन करत असून त्यांनी मराठी साहित्याला अनेक दर्जेदार साहित्यकृती दिल्या आहेत. त्यांच्या कविता महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळविण्यासोबतच विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांच्या लेखनातील सामाजिक भान, मानवी मूल्यांची जपणूक आणि भाषेवरील प्रभुत्व यामुळे विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये त्यांच्या साहित्याला विशेष मान्यता मिळाली आहे.
विशेष म्हणजे गुजरात आणि कर्नाटक राज्यांच्या मराठी अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला असून मराठी साहित्याचा प्रचार-प्रसार राज्यांच्या सीमा ओलांडून होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
काव्यलेखनासोबतच प्रा. आंधळे यांनी संपादन, समीक्षा, ललित लेखन आणि अनुवाद या क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः अहिराणी भाषेच्या जतन, संवर्धन आणि समृद्धीसाठी त्यांनी सातत्याने केलेले योगदान मोलाचे मानले जाते. ‘बा, तथागता (अहिराणी)’ या अनुवादित साहित्यकृतीच्या माध्यमातून त्यांनी मराठीतील महत्त्वपूर्ण साहित्य अहिराणी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या साहित्यिकांसाठी ही घटना प्रेरणादायी ठरत आहे. विद्यापीठीन अभ्यासक्रमात स्थान मिळाल्याने या साहित्यकृतीला व्यापक शैक्षणिक मान्यता लाभली असून विद्यार्थ्यांना भाषांतर साहित्याचा दर्जेदार अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

