काल्पनिक वेतनवाढीसाठी सेवानिवृत्तांचा एल्गार; न्यायासाठी उच्च न्यायालयात सामूहिक लढ्याची घोषणा , जळगावातील बैठकीत शेकडो मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकवटले; औरंगाबाद खंडपीठात सामूहिक याचिका दाखल करण्याचा निर्णय
![]()
काल्पनिक वेतनवाढीसाठी सेवानिवृत्तांचा एल्गार; न्यायासाठी उच्च न्यायालयात सामूहिक लढ्याची घोषणा
जळगावातील बैठकीत शेकडो मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकवटले; औरंगाबाद खंडपीठात सामूहिक याचिका दाखल करण्याचा निर्णय
अमळनेर प्रतिनिधी
जानेवारी 2006 नंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या धोरणानुसार काल्पनिक वेतनवाढ (Notional Increment) मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आज जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे शिक्षक नेते एस. डी. भिरुड महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ ( फेडरेशन) सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत शासनाच्या विद्यमान धोरणानुसार 1जानेवारी 2007 नंतर सेवानिवृत्त झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील काल्पनिक वेतनवाढ मंजूर व्हावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. यासंदर्भात शासनाने परिपत्रक जारी केले असले तरी अद्याप आवश्यक धोरणात्मक निर्णय न झाल्याने अनेक सेवानिवृत्त कर्मचारी या लाभापासून वंचित असल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर सर्व पात्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात सामूहिक याचिका दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याचिका दाखल करण्यासाठी ॲड. जितेंद्र पाटील (उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ) यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते एस. डी. भिरुड यांनी उपस्थितांना सेवा पुस्तकासह आवश्यक कागदपत्रे, त्यांची पूर्तता आणि याचिकेसाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ॲड. जितेंद्र पाटील यांनी काल्पनिक वेतनवाढीसंदर्भातील न्यायालयीन बाबी, कायदेशीर भूमिका, आवश्यक पुरावे आणि सामूहिक याचिकेचे महत्त्व यावर विस्तृत विवेचन केले.
बैठकीस एच एल पाटील ,सुनील गरुड, जी. आर. चौधरी, धनपाल सर, सुरेश अहिरे, शैलेश राणे, गोपाळ पाटील, चेतन तळेले, अजित पाटील, नारायण वाघ, गोपाळ महाजन, भावेश अहिरराव, आबा पाटील, हेमंत चौधरी, डिगंबर पाटील, डी.ए.पाटील ,एस. के. पाटील, किरण झांबरे, कैलास चौधरी, सोपान महाजन, श्रीमती पुष्पा पाटील यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत सर्व पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे न्यायालयीन लढा उभारून शासनाकडून काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.


