खवशी परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरणी अंतिम टप्प्यात, बळीराजाच्या नजरा आभाळाकडे
1 min read

खवशी परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरणी अंतिम टप्प्यात, बळीराजाच्या नजरा आभाळाकडे

Loading

 

(कृषी वार्तापत्र)

खवशी परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरणी अंतिम टप्प्यात, बळीराजाच्या नजरा आभाळाकडे

हलका पाऊस दिलासादायक; मात्र जोमदार पावसाविना पिकांच्या वाढीची चिंता कायम

| दिनकरराव पवार, तालुका प्रतिनिधी

खवशीसह पंचक्रोशीतील बहुतांश शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आता सर्वांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत. पावसाच्या आगमनापूर्वीच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची तयारी केली होती. मात्र जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत होता.

गेल्या आठवडाभरात अधूनमधून झालेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र पिकांच्या चांगल्या उगवणीसाठी आणि वाढीसाठी अद्यापही दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जोरदार पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहील, भूजलपातळीत वाढ होईल तसेच नदी-नाले, बंधारे आणि विहिरींमधील जलसाठाही वाढेल. त्यामुळे पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होऊन भविष्यातील पाणीटंचाईवरही काही प्रमाणात मात करता येईल. सध्या पुरेसा पाऊस नसल्याने जमिनीची तहान भागलेली नसून वातावरणात उकाड्याची तीव्रता कायम आहे.

दरम्यान, जून महिना बहुतांश कोरडा गेल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीची अनेक कामे रखडल्याने मजुरांच्या हाताला पुरेसे काम मिळालेले नाही.

आता परिसरातील शेतकरी दमदार पावसाची मोठ्या आशेने वाट पाहत असून, चांगला पाऊस झाल्यास पिकांना खतांची मात्रा, आंतरमशागत आणि इतर शेतीकामांना वेग येईल. त्याचबरोबर शेतमजुरांनाही रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *