धरती आबा योजनेतील कामांना गती द्या; उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – खासदार स्मिताताई वाघ
![]()
धरती आबा योजनेतील कामांना गती द्या; उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – खासदार स्मिताताई वाघ
जळगाव, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव लोकसभा मतदारसंघातील धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत समाविष्ट ३० गावांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यातील विविध विकासकामे, नव्याने समाविष्ट करता येणारी कामे तसेच जनजाती गावांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ पोहोचविण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून प्रत्येक गावातील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून सर्व कामे कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना खासदार स्मिताताई वाघ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनजाती बांधवांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील धरती आबा योजनेत अद्याप समाविष्ट न झालेल्या ३७ जनजाती गावांचा मुद्दाही उपस्थित केला. काही तांत्रिक कारणांमुळे या गावांचा योजनेत समावेश होऊ शकलेला नसल्याचे नमूद करत, या गावांचाही लवकरात लवकर योजनेत समावेश व्हावा यासाठी त्यांनी यापूर्वी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला असल्याची माहिती दिली. तसेच या प्रस्तावाचा शासन स्तरावर सुरू असलेल्या पाठपुराव्याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
जनजाती गावांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, मूलभूत सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक परिणामकारक व गतिमान पद्धतीने काम करावे, असे निर्देश खासदार स्मिताताई वाघ यांनी यावेळी दिले. बैठकीस जिल्हाधिकारी श्री.रोहनजी घुगे (IAS), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. करिश्माजी नायर (IAS), आदिवासी एकात्मिक प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी श्री.अरुणजी पवार, विविध विभागांचे सर्व प्रमुख अधिकारी, जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व गटविकास अधिकारी तसेच धरती आबा योजनेअंतर्गत समाविष्ट ३० गावांचे ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

