*ए. टी. झांबरे विद्यालयात जागतिक शिक्षणाचा अनुभव; स्वीडनस्थित माजी विद्यार्थी व कन्येचा विद्यार्थ्यांशी संवाद*
1 min read

*ए. टी. झांबरे विद्यालयात जागतिक शिक्षणाचा अनुभव; स्वीडनस्थित माजी विद्यार्थी व कन्येचा विद्यार्थ्यांशी संवाद*

Loading

*ए. टी. झांबरे विद्यालयात जागतिक शिक्षणाचा अनुभव; स्वीडनस्थित माजी विद्यार्थी व कन्येचा विद्यार्थ्यांशी संवाद*

जळगांव प्रतिनिधी

जळगाव दि. ०२/०७/२०२७ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शाळेचे माजी विद्यार्थी तथा स्वीडनमध्ये कार्यरत सॉफ्टवेअर अभियंता श्री. सच्चिदानंद पाटील यांच्या प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची पंधरा वर्षीय कन्या कु. श्रेयसी पाटील हिनेही उपस्थित राहून स्वीडनमधील शिक्षणपद्धती, तेथील शालेय जीवन आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा याविषयी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. या अनोख्या संवादातून विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण आणि करिअरच्या संधींबाबत नवा दृष्टिकोन मिळाला.
श्री. सच्चिदानंद पाटील यांनी सन १९९४ ते १९९९ या कालावधीत ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय ( तत्कालीन नाव के. सी. ई माध्यमिक विद्यालय ) येथे शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी अभियांत्रिकी पदविका आणि त्यानंतर अभियांत्रिकी पदवी पूर्ण करून सॉफ्टवेअर अभियंता म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. सन २०१७ पासून ते स्वीडनमधील गोथेनबर्ग येथे वास्तव्यास असून “वोल्वो कार” या जागतिक कीर्तीच्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मेहनतीच्या, सातत्याच्या आणि गुणवत्तेच्या बळावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कारकीर्द घडविली आहे.
स्वदेशात सुट्टीसाठी आल्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या शाळेला भेट देण्याची, शिक्षकांचे आशीर्वाद घेण्याची आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयास भेट दिली.
विद्यालयात आगमन होताच मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे मॅडम व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा लोहार यांनी त्यांचे व कन्या श्रेयसी पाटील हिचे मनःपूर्वक स्वागत केले. अनेक वर्षांनी आपल्या शाळेत परतलेल्या माजी विद्यार्थ्याचे स्वागत करताना शिक्षकांनाही विशेष आनंद झाला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सच्चिदानंद पाटील यांनी आपल्या शालेय जीवनापासून ते स्वीडनमध्ये सॉफ्टवेअर अभियंता होईपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. शिक्षणातील सातत्य, कठोर परिश्रम, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणताही विद्यार्थी जागतिक स्तरावर यश मिळवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध असून त्यासाठी मोठी स्वप्ने पाहून त्यांना पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर कु. श्रेयसी पाटील हिने स्वीडनमधील आपल्या शाळेतील शिक्षणपद्धती, डिजिटल अध्यापन, प्रकल्पाधारित शिक्षण, विद्यार्थ्यांना दिले जाणारे स्वातंत्र्य, प्रयोगशील शिक्षण, क्रीडा व सहशालेय उपक्रम, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि तेथील शालेय वातावरण याविषयी सविस्तर माहिती दिली. भारतातील आणि स्वीडनमधील शाळांमधील साम्य व फरक यांची तिने विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत ओळख करून दिली. तिच्या अनुभवांमुळे विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणव्यवस्थेची जवळून माहिती मिळाली.
यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून स्वीडनमधील शिक्षण, जीवनशैली, करिअरच्या संधी, सॉफ्टवेअर क्षेत्रातील भविष्य, भाषा, संस्कृती आणि तेथील दैनंदिन जीवनाविषयी माहिती जाणून घेतली. विद्यार्थी आणि पाहुण्यांमधील मुक्त संवादामुळे कार्यक्रम अधिक ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे मॅडम यांनी श्री. सच्चिदानंद पाटील यांचे अभिनंदन करून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर मिळविलेल्या यशाचा अभिमान व्यक्त केला. शाळेचे माजी विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाने जगभरात नाव कमावत असून त्यांचे अनुभव सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा अमूल्य ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यालयातील शिक्षिका श्रीमती पूनम कोल्हे व शिक्षक श्री विवेक मोरे यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्याशी तसेच स्वीडनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची दुर्मीळ संधी लाभली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने सच्चिदानंद पाटील व श्रेयसी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा, ज्ञान आणि जागतिक दृष्टी देणारा ठरला. आपल्या शाळेतून शिक्षण घेऊनही जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करता येते, हा आत्मविश्वास या संवादातून विद्यार्थ्यांच्या मनात अधिक दृढ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *