अफवांना बळी पडू नका; अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा! अंबाऋषी टेकडीवरील क्लोरीन गॅस गळतीबाबत सोशल मीडियावर फिरणारे मेसेज दिशाभूल करणारे; परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात – अमळनेर नगरपरिषद
![]()
अफवांना बळी पडू नका; अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा!
अंबाऋषी टेकडीवरील क्लोरीन गॅस गळतीबाबत सोशल मीडियावर फिरणारे मेसेज दिशाभूल करणारे; परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात – अमळनेर नगरपरिषद
अमळनेर प्रतिनिधी : अंबाऋषी टेकडी येथील पाणीपुरवठा केंद्रावरील क्लोरीन गॅस गळतीबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवा व अतिरंजित दाव्यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेने केले आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, ९०० किलो क्लोरीन गॅस सिलेंडरची गळती झाल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असून संबंधित सिलेंडरमध्ये सुमारे ६०० किलो गॅस होता. गळतीची शक्यता लक्षात येताच पाणीपुरवठा विभागाने तात्काळ खबरदारी घेत सिलेंडर सुरक्षित ठिकाणी हलवून विशेष पाण्याच्या कुंडीत नियंत्रित पद्धतीने रिकामा केला. त्यामुळे परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
या घटनेचा शहरातील नागरिकांवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नसून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, अतिरिक्त खबरदारी म्हणून सोमवार सायंकाळपर्यंत अंबाऋषी टेकडी परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील, नगरसेवक पंकज चौधरी, प्रताप साळी तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री केली.
“अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. नागरिकांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे,” असे आवाहन पाणीपुरवठा सभापती तात्यासाहेब कैलास पाटील यांनी केले आहे.

