धुक्यात हरवला सातपुडा! निसर्गमित्रांची पावसाळी ट्रेकिंग ठरली अविस्मरणीय
![]()
धुक्यात हरवला सातपुडा! निसर्गमित्रांची पावसाळी ट्रेकिंग ठरली अविस्मरणीय
अमळनेर प्रतिनिधी : येथील निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने एकदिवसीय पावसाळी ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या सातपुडा पर्वतरांगांचा निसर्गसौंदर्याचा अनुभव घेत मंडळातील निसर्गप्रेमींनी या भटकंतीत सहभाग घेतला. धुक्याने वेढलेले डोंगर, खळखळ वाहणारे ओढे, दाट वनराई आणि विविध प्रकारच्या वृक्ष-वेलींचे निरीक्षण करत हा ट्रेकिंग उपक्रम निसर्गप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला.
अमळनेर परिसरातून निघालेल्या निसर्गप्रेमींनी बोरअजंटी, तेल्याघाट, वैजापूरजवळील अनेर नदी ओलांडून मध्य प्रदेशातील गेरूघाटी पर्वतरांगांमध्ये प्रवेश केला. पुढे सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या उंच ताजूद्दीन डोंगराने या भटकंतीचे विशेष आकर्षण निर्माण केले.
धुक्याच्या चादरीत ताजूद्दीन डोंगर
श्रावण-भाद्रपद महिन्यात ताजूद्दीन डोंगर परिसर धुक्याने वेढलेला असतो. या परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भही लाभला आहे. ताजूद्दीन बाबा (१८६१–१९२५) हे सुफी संत होऊन गेले. त्यांच्या विषयी हिंदू आणि मुस्लीम समाजाच्या मनात आस्था आहे. ताजूद्दीन बाबांच्या दर्ग्याजवळ देवीचे मंदिर असल्याने या परिसरातील धार्मिक सलोख्याचेही दर्शन घडते.
खळखळते ओढे अन् विविध वृक्षांचे निरीक्षण
ट्रेकिंगच्या मार्गावर गिरीभ्रमण करणाऱ्यांना पावसाळ्यामुळे खळखळ वाहणारे ओढे आणि हिरवाईने नटलेली वनराई अनुभवता आली. साग, सलई, अंजन, धावडा, सादडा आणि बारतोंडी यांसारख्या विविध वृक्षांचे निरीक्षण करण्यात आले. जंगलातील कटुर्ले, गुंजपत्ता यांसारख्या वेली तसेच सागाच्या झाडाला आलेली पांढरी फुलेही निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत होती.
या प्रवासात टाक्यापाणी परिसरातील आदिवासींची स्वच्छ घरेही पाहायला मिळाली. जंगल आणि डोंगराच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे कष्टमय जीवन जवळून पाहिल्याने त्यांच्या जीवनसंघर्षाची जाणीव सहभागी गिर्यारोहकांना झाली.
निसर्गभ्रमंतीतून पर्यावरणाची जाणीव
पावसाळ्यातील सातपुडा ट्रेकिंगमुळे सहभागी निसर्गप्रेमींना केवळ डोंगर-दऱ्यांचा आनंद घेता आला नाही, तर वनसंपदा, जैवविविधता आणि आदिवासी जीवनपद्धतीचेही जवळून निरीक्षण करता आले. निसर्गाशी जवळीक साधत पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ करणारा हा उपक्रम ठरला.
या पावसाळी ट्रेकिंगमध्ये शितल देशमुख, सोमचंद संदानशिव, उमेश वाल्हे, मिलिंद कुडे, प्रा. भराटे, मिलिंद पाटील, धनंजय सोनार, धनराज महाजन आणि प्रा. धर्माधिकारी यांनी सहभाग घेतला.



