बाप एक अधिष्ठान’च्या विचारमंथनातून पितृऋणाला उजाळा , स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
बाप एक अधिष्ठान’च्या विचारमंथनातून पितृऋणाला उजाळा
स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर प्रतिनिधी:
प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर, यश पंढरी इंग्लिश क्लास आणि प्रफुल्ल कॉमर्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विचार मंचावर उपस्थित प्रा.डॉ.एस.ओ.माळी आणि यशपंढरी क्लासेस चे संचालक प्रकाश पाटील होते.
पित्याचे कुटुंबातील स्थान, त्याग, संस्कार, संघर्ष आणि मुलांच्या जडणघडणीत असलेले महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयामुळे स्पर्धेला विशेष भावनिक आणि वैचारिक स्वरूप प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनातून तसेच वक्तृत्वातून पित्याच्या भूमिकेचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले.
निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपली लेखन व वक्तृत्वकला सादर केली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांसाठी एकूण ₹५,००० रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले, तर विजेत्यांना रोख बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले.
निबंध स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक : कु. लिना गणेश पाटील
द्वितीय क्रमांक : कु. प्रेरणा वासुदेव चौधरी
तृतीय क्रमांक : कु. साक्षी अशोक बडगुजर
निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी ‘बाप’ या व्यक्तिमत्त्वाकडे केवळ कुटुंबप्रमुख म्हणून न पाहता, कुटुंबासाठी आयुष्यभर कष्ट करणारा, मुलांना दिशा देणारा आणि त्यांच्या भविष्यासाठी त्याग करणारा आधारस्तंभ म्हणून विचार मांडला.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक : कु. प्रेरणा वासुदेव चौधरी
द्वितीय क्रमांक : कु. गायत्री देविदास पाटील
तृतीय क्रमांक : साहिल कैलास भिल
वक्तृत्व स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आत्मविश्वासपूर्ण मांडणी करत पित्याचे कुटुंब आणि समाजातील योगदान, त्यांचे संस्कार तसेच मुलांच्या भविष्यासाठी केलेला संघर्ष यावर विचार व्यक्त केले. विषयाशी भावनिक नाते जोडत स्पर्धकांनी प्रभावी वक्तृत्व सादर केले.


स्मृती जपणारा प्रेरणादायी उपक्रम
स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, विचारमंथन आणि वक्तृत्वकौशल्याला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळते आणि सामाजिक व कौटुंबिक मूल्यांची जपणूक होण्यास मदत होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धांचे आयोजन सुरळीतपणे पार पडले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्पर्धेतील वैचारिक मांडणी यामुळे स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा उपक्रम संस्मरणीय ठरला.

