वटपौर्णिमेच्या गर्दीत पावसाचा कहर; विजय स्टील गल्ली जलमय गटारी तुंबल्याने भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ; ग्राहकांचीही पाण्यातून वाटचाल – नगरपरिषदेला तातडीने उपाययोजनांची मागणी
![]()
वटपौर्णिमेच्या गर्दीत पावसाचा कहर; विजय स्टील गल्ली जलमय
गटारी तुंबल्याने भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ; ग्राहकांचीही पाण्यातून वाटचाल – नगरपरिषदेला तातडीने उपाययोजनांची मागणी
अमळनेर | प्रतिनिधी
वटपौर्णिमा आणि सोमवारचा पारंपरिक आठवडी बाजार यामुळे अमळनेर शहरात सोमवारी सकाळपासून ग्रामीण व शहरी भागातील नागरिक, महिला आणि ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. बाजार तेजीत सुरू असतानाच अचानक झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण बाजारपेठ अक्षरशः विस्कळीत झाली. विशेषतः विजय स्टील गल्ली परिसरात गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाण्याचे प्रचंड साचलेले लोट पाहायला मिळाले.
क्षणार्धात रस्ते जलमय झाल्याने भाजीपाला विक्रेत्यांच्या स्टॉलमध्ये पाणी घुसले. अनेकांचा भाजीपाला पाण्यात भिजला, तर काही विक्रेत्यांना माल वाचवण्यासाठी जीवाची धडपड करावी लागली. दुसरीकडे भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्राहकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत खरेदी करावी लागली. त्यामुळे बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गटारींची नियमित साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आणि त्याचा फटका थेट व्यापारी व नागरिकांना बसला. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत हीच परिस्थिती उद्भवत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यावेळी बटाटे विक्रेते राहुल भोई म्हणाले, “दरवेळी पाऊस पडला की विजय स्टील गल्ली पाण्याखाली जाते. गटारी तुंबल्यामुळे पाणी बाहेर निघत नाही. त्यामुळे आमचा माल खराब होतो, आर्थिक नुकसान सहन करावे लागते. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन गटारींची साफसफाई व योग्य निचरा व्यवस्था करावी. अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यात अमळनेर शहरात अनेक ठिकाणी अशीच जलमय परिस्थिती निर्माण होईल.”
पावसाचे पाणी साचण्याच्या या समस्येमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अमळनेरकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

