तरुणाईच्या शक्तीने काँग्रेसला नवसंजीवनी; अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पदग्रहणाने अमळनेरमध्ये शक्तिप्रदर्शन, भाऊसाहेब आजबे, हनुमंतराव पवार, धनंजय चौधरी यांचे सरकारवर घणाघाती टीकास्त्र; ‘गाव तेथे एनएसयूआय’चा अँड. कौस्तुभ पाटील यांचा निर्धार
![]()
तरुणाईच्या शक्तीने काँग्रेसला नवसंजीवनी; अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पदग्रहणाने अमळनेरमध्ये शक्तिप्रदर्शन
भाऊसाहेब आजबे, हनुमंतराव पवार, धनंजय चौधरी यांचे सरकारवर घणाघाती टीकास्त्र; ‘गाव तेथे एनएसयूआय’चा अँड. कौस्तुभ पाटील यांचा निर्धार
अमळनेर | प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI)च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अॅड. कौस्तुभ सुनील पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्याने रविवारी अमळनेरमध्ये युवकांच्या उत्साहाला नवे बळ मिळाले. मराठा मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी, युवक, काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे सभागृह उत्साहाने भरून गेले होते. विद्यार्थी प्रश्न, शिक्षण व्यवस्था, रोजगार, संघटन बांधणी आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर मान्यवरांनी सविस्तर भूमिका मांडत युवकांना संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंतराव पवार, प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, ज्येष्ठ नेते धनगर दादा पाटील, सुरेश पिरण पाटील, श्वेता पाटील, राजेंद्र भाट, रज्जाक शेख, महेश दगडू पाटील, बन्सीलाल भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संदीप घोरपडे : “संघर्षातून उभा राहिलेला कार्यकर्ता”
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या विद्यार्थी चळवळीतील वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी पेपरफुटी, विद्यार्थी-शिक्षकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि वाढती बेरोजगारी यांचा उल्लेख केला. अशा परिस्थितीत युवकांनी संघटित होणे आवश्यक असून कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात एनएसयूआयची ताकद निश्चितच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान
कार्यक्रमात दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
धनंजय शिरीष चौधरी : “युवकांच्या बळावर पक्ष अधिक सक्षम होईल”
जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी युवक हेच काँग्रेसचे भवितव्य असल्याचे सांगितले. अॅड. कौस्तुभ पाटील यांच्यासारख्या अभ्यासू, संघर्षशील आणि संघटनक्षम नेतृत्वामुळे जिल्ह्यात युवकांची मोठी फळी तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
श्वेता पाटील : “विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढू”
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर एनएसयूआय प्रभावीपणे काम करेल. तळागाळातील विद्यार्थ्यांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करतील, अशी भूमिका श्वेता पाटील यांनी मांडली.
अँड. कौस्तुभ पाटील : “क्रांती तरुणाईच घडवते; गावागावात एनएसयूआयची शाखा उभारणार”
जंगी सत्कारानंतर आपल्या मनोगतात अॅड. कौस्तुभ सुनील पाटील यांनी पक्षश्रेष्ठी, वरिष्ठ नेते आणि उपस्थित युवकांचे आभार मानले. अमळनेर ही साने गुरुजी, प्रताप शेठ आणि काँग्रेसच्या समृद्ध परंपरेची भूमी असल्याचे सांगत त्यांनी युवकांच्या बळावर संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.


“आज माझ्या पदग्रहणासाठी ग्रामीण भागातील युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. काँग्रेसला उतरती कळा लागली असे काही जण म्हणत असले तरी नव्या पिढीच्या माध्यमातून पक्षाला पुन्हा बळ मिळेल. संघर्ष करण्याची आमची तयारी आहे आणि ही तरुणाईच परिवर्तन घडवेल,” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज, शिष्यवृत्ती अर्ज आणि विविध शैक्षणिक प्रक्रिया १ जुलैपासून एनएसयूआयच्या माध्यमातून पूर्णपणे विनामूल्य भरून देण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. “गाव तेथे एनएसयूआय शाखा” हा उपक्रम राबवून प्रत्येक गावात युवकांचे संघटन उभारले जाईल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाऊसाहेब आजबे : “आजची तरुणाई उद्याचा इतिहास लिहिणार”
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भाऊसाहेब आजबे यांनी आपल्या प्रभावी भाषणात युवकांना संघर्षाची प्रेरणा दिली. “अमळनेर ही लढवय्यांची भूमी आहे. स्वातंत्र्य चळवळीत जळगाव जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा या भूमीत आहे आणि आजची तरुणाई उद्याचा इतिहास लिहिणारी आहे,” असे ते म्हणाले.
देशातील लोकशाही संस्था, निवडणूक प्रक्रिया, सामाजिक न्याय, शेतकरी, दलित, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. काँग्रेस पक्ष संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हनुमंतराव पवार : “पेपरफुटीपासून बेरोजगारीपर्यंत सरकार अपयशी”
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार यांनी आपल्या ओघवत्या आणि आक्रमक भाषणातून शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. नीट, टीईटी आणि इतर परीक्षांमधील पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील ताण, बेरोजगारी, तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांवर त्यांनी सरकारवर टीका केली.
तसेच राज्यातील स्थानिक प्रश्न, वाळू धोरण, कायदा-सुव्यवस्था आणि इतर राजकीय घडामोडींवरही त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अनेक वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला.
अँड. अविनाश भालेराव : “संघटन विस्तार हाच यशाचा मंत्र”
जिल्हाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव यांनी युवकांना गावागावात संघटना विस्ताराचे काम करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारी संघटना समाजात विश्वास निर्माण करते, असे सांगत त्यांनी नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका बारी यांनी केले, तर महाजन सर यांनी आभार मानले.
एनएसयूआयचे विद्यार्थी, युवक, काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेला हा पदग्रहण सोहळा केवळ पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम न ठरता युवकांच्या संघटनशक्तीचे आणि काँग्रेसच्या नव्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रभावी शक्तिप्रदर्शन ठरला.
(प्रखर जनसंवाद अंकाचे प्रकाशन करतांना मान्यवर)



