धारच्या शिवटेकडीवर १००८ वृक्षांचा महायज्ञ; हरित विकासाचा ऐतिहासिक संकल्प ,  ग्रामस्थांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात शिवटेकडीवर १००८ वृक्षारोपण
1 min read

धारच्या शिवटेकडीवर १००८ वृक्षांचा महायज्ञ; हरित विकासाचा ऐतिहासिक संकल्प , ग्रामस्थांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात शिवटेकडीवर १००८ वृक्षारोपण

Loading

धारच्या शिवटेकडीवर १००८ वृक्षांचा महायज्ञ; हरित विकासाचा ऐतिहासिक संकल्प

ग्रामस्थांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात शिवटेकडीवर १००८ वृक्षारोपण

अमळनेर प्रतिनिधी
: धार गावाच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लाभलेल्या शिवटेकडीच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी तब्बल १००८ रोपांचे भव्य महावृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, प्रशासन तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकसहभागातून साकारलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने धार गावासाठी ऐतिहासिक ठरला.

मारवड व परिसर विकास मंच आणि धार–मालपुर विकास मंच यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून लोकसहभागाच्या बळावर पर्यावरण संवर्धनाचे आदर्श मॉडेल उभे राहिले आहे.

भव्य वृक्षदिंडीने शिवटेकडी दुमदुमली

महावृक्षारोपणाच्या निमित्ताने महादेव मंदिरापासून शिवटेकडीपर्यंत भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली. संत सखाराम महाराज वाडी संस्थान, अमळनेर यांचे भजनी मंडळ, धार–मालपुरचे भजनी मंडळ, शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे यांचे लेझीम पथक, महिला मंडळ तसेच कै. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर कळस घेत दिंडीत सहभाग नोंदविला.

पर्यावरणविषयक गीते, अभंग आणि घोषणांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दिंडी शिवटेकडीवर पोहोचल्यानंतर स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

ॐ नमः शिवाय’च्या मंत्रोच्चारात १००८ वृक्षारोपण

शिवटेकडीवर वृक्षारोपणाला सुरुवात होताच उपस्थितांनी सामूहिक ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जयघोष केला. त्यानंतर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या तालावर १००८ रोपांची लागवड करण्यात आली.

अभंगांचे स्वर, पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा आणि ग्रामस्थांचा उत्साह यामुळे संपूर्ण शिवटेकडीचे वातावरण भक्तिमय व पर्यावरणमय झाले. मान्यवरांसह ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

गणेश तात्या पाटील यांच्या प्रयत्नांना संदीपकुमार साळुंखे यांची साथ

शिवटेकडीच्या विकासाच्या या संकल्पामागे श्री. गणेश तात्या पाटील यांच्या अथक प्रयत्नांना श्री. संदीपकुमार साळुंखे, IRS, आयकर आयुक्त, नागपूर यांची महत्त्वपूर्ण साथ लाभली.

गणेश तात्या पाटील यांनी शिवटेकडीचा ऐतिहासिक व धार्मिक संदर्भ, टेकडीच्या विकासाची पार्श्वभूमी तसेच वृक्षारोपणापर्यंत झालेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली.

पाच वर्षांत १० हजार रोपे लावण्याचा संकल्प

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते आयकर आयुक्त, नागपूर श्री. संदीपकुमार साळुंखे यांनी मांडलेले शिवटेकडीच्या सर्वांगीण विकासाचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन.

शिवटेकडीचा विकास केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न ठेवता पुढील पाच वर्षांत १० हजार रोपे लावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

भविष्यात शिवटेकडीवर—

– विद्यार्थ्यांसाठी ध्यानमंदिर
– भव्य शिवमंदिर
– विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी
– विविध स्पर्धा व भरती प्रक्रियेसाठी अभ्यास साहित्य व सुविधा
– ओपन जिम
– पर्यावरणपूरक व आकर्षक पर्यटनस्थळ

अशा विविध सुविधा विकसित करून शिवटेकडीचे सुंदर, हिरवेगार आणि सर्वांसाठी उपयुक्त असे रूपांतर करण्याचा विकास आराखडा त्यांनी मांडला.

प्रशासनातील मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला प्रांताधिकारी श्री. मयूर भंगाळे, डीवायएसपी श्री. विनायक कोते आणि तहसीलदार श्री. सुराणा यांची उपस्थिती लाभली.

डीवायएसपी विनायक कोते यांचे सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन

अमळनेर विभागाचे डीवायएसपी श्री. विनायक कोते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सायबर फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांनी कसे सावध राहावे, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

शिवटेकडीच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू’

सौ. जयश्री अनिल पाटील यांनी आमदार महोदयांच्या वतीने शिवटेकडीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विकास मंचाच्या पाठीशी उभे राहून शिवटेकडीच्या विकासासाठी आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वन विभागाचेही मोलाचे सहकार्य

कार्यक्रमास वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल श्रीमती सुनीता धनगर, वनपाल श्रीमती बी. एन. चव्हाण, वनरक्षक श्रीमती अलका पाटील, वनरक्षक श्री. जगदीश ठाकरे तसेच वनपाल श्री. आर. व्ही. सोनवणे यांनी उपस्थित राहून उपक्रमाला सहकार्य केले.

सर्व पक्ष, सर्व समाज, सर्व स्तर एकत्र

या महावृक्षारोपण कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अमळनेर तालुक्यातील व शहरातील समाजसेवक, राजकीय पदाधिकारी आणि विविध स्तरातील नागरिक एका पर्यावरणीय ध्येयासाठी एकत्र आले.

‘हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा कार्यक्रम नसून संपूर्ण समाजाचा कार्यक्रम आहे,’ या भावनेतून सर्वांनी सहभाग नोंदविला.

मारवड व परिसर विकास मंचचे प्रमुख कार्यकर्ते श्री. विजय बापू भदाणे, निवृत्त अभियंता PWD, अध्यक्ष राकेश दादा गुरव आणि सचिव देवेंद्र साळुंखे यांचीही कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

महिला व युवकांचा विशेष सहभाग

धरतीमाता महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा सौ. छायाताई पाटील यांच्यासह महिला शेतकरी गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिला, युवक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.

काही क्षणचित्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *