हरवलेल्या सिक्कीमच्या व्यक्तीला मिळाला माणुसकीचा आधार; कृष्ण गीता नगरवासीय व धरणगाव पोलिसांच्या संवेदनशीलतेने कुटुंबाच्या चेहऱ्यावर आले हास्य ▪️माणुसकी अजून जिवंत आहे, अनोळखी व्यक्तीला आधार देत धरणगावकरांनी जपला सामाजिक बांधिलकीचा आदर्श
![]()
हरवलेल्या सिक्कीमच्या व्यक्तीला मिळाला माणुसकीचा आधार; कृष्ण गीता नगरवासीय व धरणगाव पोलिसांच्या संवेदनशीलतेने कुटुंबाच्या चेहऱ्यावर आले हास्य
▪️माणुसकी अजून जिवंत आहे, अनोळखी व्यक्तीला आधार देत धरणगावकरांनी जपला सामाजिक बांधिलकीचा आदर्श
धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील सर )
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जीवनशैलीत अनेकदा माणूसकीचे दर्शन दुर्मिळ होत चालले आहे. मात्र धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर परिसरातील नागरिकांनी एका अनोळखी, असहाय्य आणि मानसिकदृष्ट्या कमजोर व्यक्तीला आधार देत समाजासमोर माणुसकीचा सुंदर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे सिक्कीम राज्यातील हरवलेल्या व्यक्तीची अखेर त्याच्या परिवाराशी सुखरूप भेट घडून आली.
सविस्तर वृत्त असे की, सिक्कीम राज्यातील सित्तम, वेस्ट सिक्कीम येथील नारायण जीत कामी (वय ३९) हे गेल्या पंधरा दिवसांपासून घरापासून दूर होते. मानसिक स्थिती ठीक नसल्याने ते भटकत भटकत धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर परिसरात आले. रात्रीच्या सुमारास तेथील नागरिकांकडे त्यांनी जेवण व पाण्याची मागणी केली. त्यांची अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता माणुसकीच्या भावनेतून त्यांना मदतीचा हात दिला. महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक पी. डी. पाटील, एस. एन. कोळी आणि मुख्याध्यापक जे. एस. पवार यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो घाबरलेला होता तसेच त्याला फक्त तोडकी हिंदी बोलता येत असल्याने संवाद साधण्यात अडचणी येत होत्या. मात्र त्याला प्रथम पाणी देऊन, विश्वासात घेऊन त्याची विचारपूस करण्यात आली. यानंतर पत्रकार पी. डी. पाटील यांनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ व धरणगाव पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन धरणगाव पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देत घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीची काळजी घेतली. पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नारायण जीत कामी यांची चौकशी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कदम तसेच पोलीस कर्मचारी सुमित बाविस्कर, योगेश पाटील, गुलाब महाजन, समाधान भागवत यांनी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. प्रयत्नांती त्या व्यक्तीने आपल्या घरचा मोबाईल क्रमांक सांगितला आणि पोलिसांनी तात्काळ त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. दरम्यान, त्यांची बहीण मुंबई येथील बांद्रा परिसरात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. धरणगाव पोलिसांनी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणून जेवणाची व्यवस्था केली आणि सुरक्षित निवारा दिला. रात्रीच त्यांचे नातेवाईक मुंबईहून धरणगावकडे रवाना झाले. सकाळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नारायण जीत कामी यांना त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे सिक्कीममधील त्यांच्या कुटुंबीयांनी धरणगाव पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव आणि कृष्ण गीता नगरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
▪️*माणुसकीचा संदेश देणारी घटना*
आजच्या काळात “आपल्याला काय देणे-घेणे” अशी भावना वाढत असताना कृष्ण गीता नगरवासीयांनी मात्र एका अनोळखी व्यक्तीला आपलेपणाने स्वीकारले. जाती, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन एका व्यक्तीच्या जीवनाची काळजी घेणे हीच खरी माणुसकी आहे. धरणगावकरांनी दाखवून दिले की, संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देण्यासाठी मोठी पदे किंवा साधने लागत नाहीत. फक्त संवेदनशील मन आणि मदतीची भावना आवश्यक असते. या घटनेतून समाजाला सकारात्मक संदेश मिळाला असून धरणगाव पोलिसांच्या तत्परतेचे आणि नागरिकांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी सपोनि. सुनील कदम, कृष्ण गीता नगरवासीय, महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एस. पवार, एस. एन. कोळी, पत्रकार आबासाहेब राजेंद्र वाघ, पी. डी. पाटील, बांद्रा येथील दिया नरबहादुर, खुशी विश्वकर्मा व नातेवाईक उपस्थित होते.

