पंचनामे झाले, तरी नुकसानभरपाईचा पत्ता नाही! , खवशी पंचक्रोशीतील नाल्याकाठचे शेतकरी वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत; नाल्याची रुंदी वाढविण्याचीही मागणी
1 min read

पंचनामे झाले, तरी नुकसानभरपाईचा पत्ता नाही! , खवशी पंचक्रोशीतील नाल्याकाठचे शेतकरी वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत; नाल्याची रुंदी वाढविण्याचीही मागणी

Loading

पंचनामे झाले, तरी नुकसानभरपाईचा पत्ता नाही!

खवशी पंचक्रोशीतील नाल्याकाठचे शेतकरी वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत; नाल्याची रुंदी वाढविण्याचीही मागणी

अमळनेर प्रतिनिधी(दिनकर पवार)
: गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने खवशी पंचक्रोशीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खवशीसह नांद्री, पातोंडा, दापोरी आणि सोनखेडी परिसरातील नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची प्रशासनाकडून रितसर पाहणी करून पंचनामेही करण्यात आले होते. मात्र पंचनामे होऊनही संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची तरतूद अद्याप झालेली नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

नाल्याची रुंदी कमी; पुराचे पाणी थेट शेतात

या परिसरातील सुटा नाल्याचा उगम पारोळा तालुक्यातील पळासखेडे व राजवड येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या अभयारण्य परिसरातून होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उगम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास नाल्यात अचानक पाण्याची आवक वाढते.
नाल्याची रुंदी अपुरी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत न होता पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरते. परिणामी दरवर्षी नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

दरवर्षी पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्याच्या उगमापासूनच त्याची रुंदी वाढवून आवश्यक ठिकाणी खोलीकरण व प्रवाहाची व्यवस्था करावी, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्याचा प्रवाह सुरळीत होऊन शेतांमध्ये पाणी शिरण्याचा धोका कमी होऊ शकतो.

नुकसानभरपाई तातडीने द्या

गेल्या वर्षीच्या पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रशासनाने पंचनामे केले आहेत. त्यामुळे पंचनाम्याच्या आधारे रखडलेले नुकसानभरपाई अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि भविष्यात पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया

नुकसानग्रस्त शेतकरी म्हणतात…
आनंदा गोसावी :
“गेल्या वर्षी नाल्याला आलेल्या पुरात आमच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. प्रशासनाकडून पंचनामेही करण्यात आले. मात्र आजपर्यंत नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासनाने आमच्या नुकसानीची दखल घेऊन रखडलेली नुकसानभरपाई तातडीने द्यावी.”

— पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी
“पंचनामे झाले, आता नुकसानभरपाईची प्रतीक्षा संपवा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *