विद्यार्थी आंदोलनातून जिल्हाध्यक्षपदापर्यंत; अँड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय , अँड. कौस्तुभ पाटील यांचा आज पदग्रहण सोहळा
![]()
विद्यार्थी आंदोलनातून जिल्हाध्यक्षपदापर्यंत; अँड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय
अँड. कौस्तुभ पाटील यांचा आज पदग्रहण सोहळा
अमळनेर प्रतिनिधी :
विद्यार्थी चळवळीतील आक्रमक, अभ्यासू आणि संविधाननिष्ठ नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे अँड. कौस्तुभ सुनील पाटील यांच्या अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) जळगाव जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल आज रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांच्या अपेक्षांचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या या सोहळ्याकडे जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अँड. भैय्यासाहेब संदीप पाटील (वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) राहणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, जळगाव जिल्हा काँग्रेस (पश्चिम) अध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस (पूर्व) अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
संघर्षातून घडलेले नेतृत्व
विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक प्रश्न, शिक्षण व्यवस्था आणि संविधानिक मूल्यांसाठी लढणारे अॅड. कौस्तुभ पाटील यांनी विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स येथील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांच्या नियुक्तीतील कथित नियमबाह्य प्रक्रियेचा मुद्दा सर्वप्रथम त्यांनी उपस्थित केला. यूजीसी नियमांचा अभ्यास करून त्यांनी उभारलेल्या जनआंदोलनानंतर संबंधित प्रकरणात कारवाई झाली. तसेच संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
याचबरोबर पुण्यातील शैक्षणिक संस्थांमधील कथित आर्थिक अनियमिततेविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची राज्यभरात व्यापक चर्चा झाली.
धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी भूमिका
फर्ग्युसन महाविद्यालयातील धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, या संविधानिक भूमिकेतून अॅड. कौस्तुभ पाटील यांनी आंदोलन उभारले. सर्व धर्मांना समान वागणूक मिळावी आणि शैक्षणिक संस्था धर्मनिरपेक्ष मूल्यांचे प्रतीक राहाव्यात, हा त्यामागील मूलभूत आग्रह होता.
CAA/NRC आंदोलनात सक्रिय सहभाग
२०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर सुरू झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुण्यातील आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळचा त्यांचा आंदोलनातील फोटो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अभ्यासक सुहास पळशीकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाजमाध्यमांवर शेअर केला होता.
समाजसेवेची बालवयापासून जपलेली परंपरा
२०१४-१५ मध्ये साने गुरुजी विद्यालयातील मित्रांसमवेत “न्यू थिंक, न्यू वर्क” या समूहाची स्थापना करून अमळनेर बसस्थानक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दिवाळीत गरजूंसाठी फराळ व कपडे संकलित करून झोपडपट्टीतील कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा उपक्रमही त्यांनी यशस्वी केला.
साहित्य, वक्तृत्व आणि संघटन कौशल्याची छाप
श्रमिक मंडळ आणि जैन इरिगेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या प्रथम राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनात त्यांनी मुख्य निवेदक म्हणून तब्बल पाच तास प्रभावी सूत्रसंचालन केले. त्यांच्या या निवेदनाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली होती.
संघटनात्मक वाटचाल
२०१५ – तालुका उपाध्यक्ष, अमळनेर


२०१७ ते २०२० – शाखाध्यक्ष, एनएसयूआय, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
२०२३ – समन्वयक, पुणे लोकसभा
२०२४ – अध्यक्ष, अमळनेर तालुका युवक काँग्रेस
२०२६ – जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI), जळगाव ग्रामीण (पश्चिम)
त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत मराठी लाईव्ह न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा “युवा कार्यकर्ता” म्हणून गौरव करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांचे प्रश्न, संविधानिक मूल्यांची जपणूक, सामाजिक उत्तरदायित्व आणि संघर्षशील नेतृत्व या चौकटीत घडलेले अॅड. कौस्तुभ सुनील पाटील यांचे नेतृत्व आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी चळवळीला नवी ऊर्जा देईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.





