“संविधानापेक्षा कोणी मोठे नाही; आ. प्रसाद लाड प्रशासनावर दबाव का आणत आहेत?” – भीमराव महाजन यांचा आक्रमक सवाल
1 min read

“संविधानापेक्षा कोणी मोठे नाही; आ. प्रसाद लाड प्रशासनावर दबाव का आणत आहेत?” – भीमराव महाजन यांचा आक्रमक सवाल

Loading

*आ. प्रसाद लाड संविधान आणि कायद्यापेक्षा मोठे आहेत काय? – समता परिषदेचे भीमराव महाजन यांचा सवाल*

जळगाव / प्रतिनिधी
बोगस नोंदीच्या आधारे घेतलेले कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतरही त्या नोंदीसाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची चित्रफीत समोर आली आहे. कायद्याने स्थापन झालेल्या संवैधानिक समितीच्या निर्णयानंतरही अशा प्रकारचा दबाव टाकला जात असेल तर संबंधित लोकप्रतिनिधी स्वतःला संविधान आणि कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत काय? असा सवाल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जळगाव जिल्हा संघटक, भीमराव महाजन यांनी केला आहे.
माजलगाव येथील एका नगरसेविकेचे बोगस नोंदीच्या आधारे काढलेले कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यानंतर त्याच नोंदीला अधिकृत ठरविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची चित्रफीत समोर आली आहे. जात पडताळणी समितीने एखादी नोंद बोगस ठरविल्यानंतर ती पुन्हा अधिकृत ठरविण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा प्रश्नही भीमराव महाजन यांनी उपस्थित केला आहे.
संवैधानिक यंत्रणांच्या कार्यात हस्तक्षेप करून त्यांच्यावर दबाव आणणे हे लोकशाही आणि कायद्याच्या राज्यासाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संवैधानिक पदाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधींनी संविधानाचा सन्मान राखणे अपेक्षित असताना अशा घटना चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ओबीसी समाजामध्ये बोगस नोंदीच्या आधारे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांना कोणाचेही पाठबळ मिळू नये, अशी भूमिका व्यक्त करताना भीमराव महाजन म्हणाले की, ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
तसेच या विषयाकडे राज्य शासन आणि मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जळगाव जिल्हा संघटक, भीमराव महाजन यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *