भुसावळात योगमय वातावरण; 21 जून रोजी 30 हजारांपर्यंत विद्यार्थी-शिक्षक करणार सामूहिक योगाभ्यास,  जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; शाळांमध्ये योग व प्राणायामाची व्यापक तयारी
1 min read

भुसावळात योगमय वातावरण; 21 जून रोजी 30 हजारांपर्यंत विद्यार्थी-शिक्षक करणार सामूहिक योगाभ्यास, जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; शाळांमध्ये योग व प्राणायामाची व्यापक तयारी

Loading

 

भुसावळात योगमय वातावरण; 21 जून रोजी 30 हजारांपर्यंत विद्यार्थी-शिक्षक करणार सामूहिक योगाभ्यास

जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; शाळांमध्ये योग व प्राणायामाची व्यापक तयारी

भुसावळ (प्रतिनिधी) : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त भुसावळ शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर योग व प्राणायाम कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ, क्रीडा भारती भुसावळ आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी उपस्थित होत्या. यावेळी राज्य योग प्रशिक्षक व क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी, योगशिक्षक मनोज रावत, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे प्रशांत देवरे यांच्यासह विविध शाळांमधील क्रीडा शिक्षक तसेच प्रत्येक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिरात चंचल माळी, मनोज रावत, देवश्री सुभाष पाटील आणि यशश्री प्रदीप नांद्रे यांनी विविध योगासने, प्राणायाम प्रकार आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेत योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.
या प्रशिक्षणात सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक आता आपल्या-आपल्या शाळांमध्ये जाऊन इतर विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना योग व प्राणायामाचे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे 21 जून रोजी भुसावळ परिसरातील विविध शाळांमध्ये तब्बल 25 ते 30 हजार विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी सामूहिक योगाभ्यासात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे आणि तालुका क्रीडा अधिकारी मिनल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा भारती भुसावळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ (जळगाव) तसेच अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भुसावळ शहरात निर्माण झालेल्या या योगमय वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *