धान्य वितरणासाठी मुदतवाढीची मागणी; स्वस्त धान्य दुकानदार संघटना आक्रमक, वेळेत धान्य उपलब्ध न झाल्याने लाभार्थ्यांचे वितरण रखडले; तहसीलदारांकडे निवेदन सादर
![]()
धान्य वितरणासाठी मुदतवाढीची मागणी; स्वस्त धान्य दुकानदार संघटना आक्रमक
वेळेत धान्य उपलब्ध न झाल्याने लाभार्थ्यांचे वितरण रखडले; तहसीलदारांकडे निवेदन सादर
अमळनेर, प्रतिनिधी :
माहे जून २०२६ च्या अन्नधान्य वितरणासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अमळनेर येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदार तथा पुरवठा विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाकडून धान्याचा पुरवठा वेळेत न झाल्यामुळे दुकानदारांना निर्धारित मुदतीत लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचविणे शक्य झाले नसल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
शासनाच्या आदेशानुसार माहे मे व जून २०२६ या दोन्ही महिन्यांचे अन्नधान्य १५ जून २०२६ पर्यंत वितरित करणे अपेक्षित होते. मात्र एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या कालावधीत धान्याचा पुरवठा नियोजित वेळेत व एकत्रित स्वरूपात दुकानांवर उपलब्ध करून देण्यात आला नसल्याने वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. प्रत्येक महिन्याचे धान्य त्याच महिन्यात उपलब्ध झाल्यामुळे दुकानदारांना शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत वितरण पूर्ण करता आले नाही.
यामुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळण्यास विलंब झाला असून, शासनाने परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जून महिन्याच्या धान्य वितरणासाठी तातडीने मुदतवाढ जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याबाबतचे निवेदन शहराध्यक्ष दिलीप राधामल सैनानी आणि तालुकाध्यक्ष प्रविण रामपुरी गोसावी यांनी तहसीलदार कार्यालयाकडे सादर केले.
प्रतिक्रिया
“शासनाने निर्धारित केलेल्या वेळेत धान्य दुकानांपर्यंत पोहोचविले असते तर दिलेल्या मुदतीत वितरण पूर्ण करणे सहज शक्य झाले असते. गेल्या वर्षभरात मुदतवाढीची गरज भासली नव्हती. मात्र यावेळी धान्याचा पुरवठा उशिरा झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. शासन शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित ठेवणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
— प्रविण गोसावी
तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, अमळनेर

