साने गुरुजी शिक्षण संस्थेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा  विद्यार्थ्यांचा स्त्री-पुरुष समानतेचा प्रेरणादायी संदेश; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली शाळा
1 min read

साने गुरुजी शिक्षण संस्थेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांचा स्त्री-पुरुष समानतेचा प्रेरणादायी संदेश; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली शाळा

Loading

साने गुरुजी शिक्षण संस्थेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांचा स्त्री-पुरुष समानतेचा प्रेरणादायी संदेश; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली शाळा

अमळनेर, प्रतिनिधी :
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या हायस्कूल यांच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे हे होते, तर गुणवंतराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. “मेहनतीला नेहमीच गोड फळे मिळतात” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी केले. शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास, आलेले चढ-उतार आणि संस्थेची यशस्वी वाटचाल यांचा त्यांनी आढावा घेतला. आजचे यश हे पूर्वीच्या शिक्षक, व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळेच्या जडणघडणीची स्वतः साक्षीदार असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक डी. वाय. पाटील यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून दिली. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज सैन्यदल, विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, न्यायव्यवस्था तसेच विविध कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही अभ्यासात सातत्य ठेवून यशाची नवी शिखरे गाठावीत, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मयूर पाटील, तपन पाटील आणि नेहा पाटील यांनी आपल्या अनुभवांवर आधारित मनोगत व्यक्त केले. तर कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी हिमानी पाटील, समृद्धी मराठे, निशा महाजन आणि वैदर्भी पवार यांनी सादर केलेल्या सामाजिक आशय असलेल्या नाटिकेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मैदानावर “हॅप्पी बर्थडे” ही मानवी आकृती तयार केली. मुलं आणि मुली यांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबवत स्त्री-पुरुष समानतेचा प्रभावी संदेश समाजापुढे ठेवला. समाजातील लिंगभेद कमी करून समानतेची भावना रुजविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलची कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करत भावनिक अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक जे. एस. पाटील यांनी केले, तर डी. ए. धनगर यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी विद्यार्थ्यांनी “खरा तो एकची धर्म” ही प्रार्थना आणि प्रेरणादायी घोषणा देत कार्यक्रमाची सांगता केली.
या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ३५ वर्षांची उज्ज्वल परंपरा जपत शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीवांचा संदेश देणारा हा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *