प्रभाग 16 च्या* *नगरसेविका सौ. निलिमा पाटील यांचे आवाहन : घंटागाडी असताना रस्त्यावर कचरा का?; स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी*
1 min read

प्रभाग 16 च्या* *नगरसेविका सौ. निलिमा पाटील यांचे आवाहन : घंटागाडी असताना रस्त्यावर कचरा का?; स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी*

Loading

प्रभाग 16 च्या*
*नगरसेविका सौ. निलिमा पाटील यांचे आवाहन : घंटागाडी असताना रस्त्यावर कचरा का?; स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी*

अमळनेर प्रतिनिधी :
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून नियमितपणे घंटागाडीच्या माध्यमातून घराघरातून कचरा संकलन केले जात आहे. मात्र, ही सुविधा उपलब्ध असतानाही काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने स्वच्छता अभियानाला मोठा धक्का बसत आहे.

विशेषतः गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. दररोज शेकडो महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक या मार्गाने दर्शनासाठी जात असतात. अशा वेळी रस्त्यालगत पडलेली घाण, प्लास्टिक कचरा आणि दुर्गंधीमुळे परिसराचे पावित्र्य आणि सौंदर्य दोन्हीही बाधित होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
याहूनही गंभीर बाब म्हणजे काही मंडळी आपल्या घरासमोर मोकळी जागा असल्यास घंटागाडीत कचरा न टाकता तो थेट त्या जागेत टाकतात. काही वेळा स्वतःच्या घरासमोर घाण होऊ नये म्हणून दुसऱ्यांच्या घरासमोर किंवा सार्वजनिक जागांमध्ये कचरा टाकण्याचे प्रकारही घडत असल्याचे दिसून येत आहे. स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या काही नागरिकांकडून होणारे हे वर्तन सामाजिक जबाबदारीला हरताळ फासणारे असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. अशा प्रकारांमुळे परिसराचे सौंदर्य बिघडण्याबरोबरच इतर नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून उघड्यावर साचलेला कचरा डासांची उत्पत्ती, दुर्गंधी आणि विविध संसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाबाबत प्रत्येकाने जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे.

स्वच्छता ही सगळ्यांची जबाबदारी

प्रभाग क्रमांक १६ च्या नगरसेविका सौ. निलिमा विश्वनाथ पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, “घंटागाडी नियमितपणे येत असताना कचरा रस्त्यावर, मोकळ्या जागेत किंवा दुसऱ्यांच्या घरासमोर टाकणे योग्य नाही. स्वच्छता ही केवळ नगरपालिका किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ होतो. त्यामुळे सर्वांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी अमळनेर घडविण्यासाठी सहकार्य करावे.”

“मोकळ्या जागेत नाही, घंटागाडीतच कचरा टाका; स्वच्छ परिसर हीच खरी सामाजिक जबाबदारी!” अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कॉटन मार्केट मागील गुरुकृपा कॉलनी तसेच नाल्याजवळील भालेराव नगर परिसरातही मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. घंटागाडीची सुविधा उपलब्ध असतानाही काहीजण मोकळ्या जागा आणि नाल्यांच्या कडेला कचरा टाकत असल्याने परिसर अस्वच्छ होत आहे. यामुळे दुर्गंधी, डासांची वाढ आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यात हा कचरा नाल्यात वाहून जाऊन पाणी तुंबण्याचाही धोका निर्माण होत असल्याने नागरिकांनी तात्काळ ही सवय बदलावी, असे आवाहन प्रभाग सोळाच्या नगरसेविका निलीमा पाटील
यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *