पुणे येथील ‘समरसता लोककला संमेलनात’ सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे निमंत्रित
![]()
पुणे येथील ‘समरसता लोककला संमेलनात’ सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे निमंत्रित
एरंडोल प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि समरसता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले पहिले ‘समरसता लोककला संमेलन’ रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दिवसभर उत्साहात संपन्न होणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ लोककलावंत पद्मश्री रघुवीरजी खेडकर भूषविणार आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील नामवंत लोककलावंत, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संमेलनाच्या समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. अविनाशजी आवलगावकर, कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर (अमरावती) हे भूषविणार आहेत.
संमेलनात पारंपरिक लोककलेचे दर्शन, सांस्कृतिक दिंडी, विविध लोककला सादरीकरणे, चर्चासत्रे आणि निमंत्रितांचे कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमंत्रित कवी संमेलनासाठी खान्देशातील सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक आणि ‘लेक वाचवा’ अभियानाचे पुरस्कर्ते प्रा. वा. ना. आंधळे यांना निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
गेल्या चार दशकांपासून सातत्याने काव्यसाधना करणाऱ्या प्रा. आंधळे यांच्या कविता महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यांतील शालेय तसेच विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. स्त्रीभ्रूणहत्येविरोधात त्यांनी लिहिलेल्या ‘आई मला जन्म घेऊ दे’ या कवितेला राज्यासह देशभर मोठा जनाधार लाभला आहे. या कवितेचे इंग्रजीसह तब्बल पंचेचाळीस भारतीय भाषा आणि बोलीभाषांमध्ये उत्स्फूर्त अनुवाद झाले असून ही कविता देशाच्या सीमांपलीकडे सातासमुद्रापार पोहोचली आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक आणि कवी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी मानवतावादावर आधारित मराठी भाषेत लिहिलेल्या ‘बा, तथागता’ या अडीचशे पानी विशाल कवितेचा प्रा. आंधळे यांनी अहिराणी बोलीत केलेला अनुवादही विशेष गाजला आहे. अहिराणी बोलीचे अभ्यासक, संशोधक आणि समीक्षक यांनी या अनुवादाचे मनापासून कौतुक केले आहे.
प्रा.आंधळे यांच्या ‘फर्मान आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहावर महाराष्ट्रातून चाळीस समीक्षकांनी समीक्षा लेखन केले असून ‘फर्मान आणि इतर कविता : आशय आणि आस्वाद’ या शिर्षकाने समीक्षक प्रा.डॉ.तुषार चांदवडकर यांनी या समीक्षा ग्रंथाचे संपादन केलेय.
महाराष्ट्रभर आयोजित व्याख्यानमाला, शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्थांच्या व्यासपीठांवरून प्रा. आंधळे यांची कवितेवरील व्याख्याने विशेष लोकप्रिय ठरली आहेत. आकाशवाणी जळगाव केंद्रावरून काव्यवाचन, काव्यचर्चा आणि मुलाखतींच्या माध्यमातूनही त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. तसेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि दिल्ली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या एकूण पाच मराठी व हिंदी मालिकांसाठी त्यांनी शीर्षक गीत लेखन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण संमेलनात निमंत्रित कवी म्हणून झालेला त्यांचा सहभाग हा त्यांच्या दीर्घकालीन साहित्यसाधना आणि सृजनशील कार्याचा गौरव मानला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पंचक्रोशीतील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून सर्व स्तरांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

