अमळनेरमध्ये निरंकारी भक्तांचा रक्तदान महायज्ञ; ५३ रक्तदात्यांनी दिले जीवनदान बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; मानवता, करुणा आणि सेवाभावाचा संदेश
![]()
अमळनेरमध्ये निरंकारी भक्तांचा रक्तदान महायज्ञ; ५३ रक्तदात्यांनी दिले जीवनदान
बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; मानवता, करुणा आणि सेवाभावाचा संदेश
अमळनेर, प्रतिनिधी : संत निरंकारी मिशनच्या वतीने युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या पावन स्मृतीनिमित्त आयोजित रक्तदान अभियानांतर्गत अमळनेर येथे झालेल्या रक्तदान शिबिरात ५३ निरंकारी भक्तांनी रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श निर्माण केला. संत निरंकारी सत्संग भवन, सिंधी कॉलनी, चोपडा रोड येथे रविवारी पार पडलेल्या या उपक्रमास रक्तदाते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
देशभरात वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सेवा उपक्रमांच्या प्रारंभाचा भाग म्हणून संत निरंकारी मिशनतर्फे सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. करुणा, एकात्मता आणि निःस्वार्थ सेवाभाव दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या चार दशकांपासून सुरू असलेल्या या रक्तदान परंपरेत आतापर्यंत ९,१७४ शिबिरांमधून सुमारे १५ लाखांहून अधिक रक्त युनिट्सचे संकलन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी १३ जून रोजी अमळनेर शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर १४ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित शिबिरात रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथील रक्तकेंद्र विभागाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तदात्यांची आरोग्य तपासणी करून सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलन प्रक्रिया पूर्ण केली.
युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांनी सत्य, साधेपणा व सद्भावनेचा मार्ग स्वीकारत समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी दिलेला “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा प्रेरणादायी संदेश आजही मिशनच्या विविध सेवा उपक्रमांमधून प्रभावीपणे पुढे नेला जात आहे. सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा परंपरा अधिक व्यापक होत आहे.
शिबिराचे उद्घाटन धुळे झोन ३६-बीचे झोनल इंचार्ज आ.म. श्री हिरालाल पाटीलजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी अमळनेर शाखेचे प्रमुख आ. श्रीचंद निरंकारीजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रक्तदात्यांना अल्पोपहार, चहा, बिस्कीट, फळफळावळ तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सेवादल इंचार्ज जितेंद्र डिंगराई, महिला इंचार्ज प्रीती बटेजा यांच्यासह अमळनेर शाखेतील सेवादल सदस्य व साधसंगत यांनी विशेष परिश्रम घेतले.

