विद्यार्थ्यांनी आवड, क्षमता आणि संधींचा अभ्यास करूनच करिअर निवडावे : डॉ. नितीन शेरजे, “कोणी सांगितले म्हणून नाही, तर स्वतःची क्षमता ओळखून क्षेत्र निवडा” डॉ. पुष्पराज वारके यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; करिअर सेमिनारमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद , 👉 नर्मदा रिसॉर्ट येथे करिअर गाईडन्स सेमिनार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 👉 इंजिनिअरिंग, फार्मसी, CET, JEE, NEET आणि उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत
![]()
विद्यार्थ्यांनी आवड, क्षमता आणि संधींचा अभ्यास करूनच करिअर निवडावे : डॉ. नितीन शेरजे
“कोणी सांगितले म्हणून नाही, तर स्वतःची क्षमता ओळखून क्षेत्र निवडा”
डॉ. पुष्पराज वारके यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; करिअर सेमिनारमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
👉 नर्मदा रिसॉर्ट येथे करिअर गाईडन्स सेमिनार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
👉 इंजिनिअरिंग, फार्मसी, CET, JEE, NEET आणि उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि करिअरला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी (पुणे), IKD Maths Academy व P.T.A. अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर गाईडन्स सेमिनार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रविवारी (दि. १४ जून) नर्मदा रिसॉर्ट, गलवाडे रोड, अमळनेर येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विचारपीठावर डॉ. नितीन पी. शेरजे (प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे), डॉ. पुष्पराज वारके (अधिष्ठाता – प्रथम वर्ष), प्रा. किरण माळी (संचालक, IKD Maths Academy), भैय्यासाहेब मगर (अध्यक्ष, P.T.A. संघटना तथा संचालक, साई इंग्लिश अकॅडमी), प्रा. पंकज परदेशी, प्रा. जितेंद्र नरखेडे, डॉ. अमित चौधरी, कैलास पाटील (नर्मदा रिसॉर्ट), तसेच पत्रकार ईश्वर महाजन उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नितीन पी. शेरजे यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडताना केवळ इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून न राहता स्वतःची आवड, क्षमता आणि उपलब्ध संधींचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला दिला. अनेक विद्यार्थी अपुऱ्या माहितीच्या आधारे करिअरचे निर्णय घेतात, त्यामुळे संबंधित क्षेत्राची संपूर्ण माहिती घेऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यशस्वी करिअरसाठी योग्य माहिती आणि योग्य निर्णय हेच सर्वात महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. पुष्पराज वारके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “योग्य ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर योग्य मार्गाची निवड करावी लागते. कोणी सांगितले म्हणून एखाद्या क्षेत्रात प्रवेश घेऊ नका. प्रत्येक क्षेत्रात संधी आहेत; मात्र त्या ओळखून त्यांचा लाभ घेण्याची तयारी असावी.” त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची निवड करताना प्रत्यक्ष भेट देऊन, तेथील वातावरण समजून घेऊन आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असा मौल्यवान सल्ला दिला.
सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांतील संधी, CET, JEE, NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम निवड आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकांचे निरसनही तज्ज्ञांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास, वेळेचे योग्य नियोजन आणि योग्य वयात अभ्यासाबाबत गंभीर होण्याची आवश्यकता असल्याचे वक्त्यांनी सांगितले. “मार्कवंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा,” असा प्रेरणादायी संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.
IKD Maths Academy चे संचालक प्रा. किरण माळी यांनी आपल्या मनोगतात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पालकांचेही कौतुक केले. अकॅडमीची शैक्षणिक गुणवत्ता अधिकाधिक उंचावण्यासाठी सर्व विद्यार्थी व पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी पीटीए संघटनेचे अध्यक्ष तथा साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैय्यासाहेब मगर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशासाठी केवळ परिश्रमच नव्हे, तर योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. “विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली आणि योग्य शिक्षक व क्लासेसचे मार्गदर्शन लाभले, तर त्यांच्या यशाची घोडदौड निश्चितपणे सुरू होते,” असे ते म्हणाले. गणितासारख्या महत्त्वाच्या विषयात विद्यार्थ्यांची भक्कम पायाभरणी व्हावी यासाठी प्रा. किरण माळी सर सातत्याने मेहनत घेत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व कौशल्याला वाव देण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात विविध परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांच्या योगदानाची दखल घेत अनेक पालकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुरली इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. किरण माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश पाटील यांच्यासह IKD Academy च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त केली.
“योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भविष्य!”
विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी आयोजित हा उपक्रम अमळनेर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरला.



