गावाच्या गौरवशाली परंपरेला सलाम; प्रा. शाम पवार व हिरालाल पवार यांचा नागरी सन्मान
![]()
गावाच्या गौरवशाली परंपरेला सलाम; प्रा. शाम पवार व हिरालाल पवार यांचा नागरी सन्मान
अमळनेर प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत खेडी प्र.ज. व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गावाच्या विकासात व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सोहळ्यात प्रा. शाम साहेबराव पवार यांचा नुकत्याच पार पडलेल्या शेतकी संघ निवडणुकीत शेतकरी पॅनलतर्फे भरघोस मतांनी विजयी होऊन संचालकपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. तसेच हिरालाल दत्तात्रय पवार यांनी शिक्षकी क्षेत्रात तब्बल २६ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचाही ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. डी. पाटील होते. मंचावर गावाच्या प्रशासक सौ. आशाताई ज्ञानदेव पाटील, उपसरपंच शोभाबाई भास्कर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कारानंतर गावातील विलास शिंदे व ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव केला. प्रमुख पाहुणे महेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात दोन्ही सत्कारमूर्ती गावाच्या प्रगतीसाठी आणि समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. शाम पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत शेतकी संघात प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकोप्याने राहण्याचे आवाहन केले. तर हिरालाल पवार यांनी सेवानिवृत्तीनंतरही गावाच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय समारोपात प्रा. डी. डी. पाटील यांनी दोन्ही मान्यवरांनी आपल्या कार्यातून गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
या सोहळ्यास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पोलीस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कैलास पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. जिजाब पाटील यांनी केले.

