बासरीच्या सुरांत रंगला कृष्णजन्माचा सोहळा! ,आर.के. नगरात प्राचार्य पी. के. पाटील यांच्या निवासस्थानी जन्माष्टमी उत्साहात; आबासाहेब गोकुळ पाटील यांचे प्रभावी प्रबोधन
![]()
बासरीच्या सुरांत रंगला कृष्णजन्माचा सोहळा!
आर.के. नगरात प्राचार्य पी. के. पाटील यांच्या निवासस्थानी जन्माष्टमी उत्साहात; आबासाहेब गोकुळ पाटील यांचे प्रभावी प्रबोधन
अमळनेर प्रतिनिधी
“कृष्ण सदा सहाय्यते!” या भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात आर.के. नगरातील प्राचार्य पी. के. पाटील यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते पहाटे १ वाजेपर्यंत झालेल्या या सोहळ्याला परिसरातील नागरिक, मान्यवर आणि पाटील कुटुंबीयांची मोठी उपस्थिती लाभली.
“भगवान कृष्णाचे आयुष्य हे त्यागाचा उत्सव आणि आनंद जगण्याची कला आहे,” या विचाराने कार्यक्रमाची सांगता झाली. भक्ती, अध्यात्म आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या संगमामुळे संपूर्ण परिसर कृष्णमय झाला होता.
गवळण-भारुडाने रंगत; पोवाड्याने जागवला उत्साह
जन्माष्टमी सोहळ्यात गवळण, भारुड, अभंग आणि पोवाड्याच्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. इंजिनिअर उज्वल पाटील यांनी सादर केलेली रसाळ ‘बोबडी गवळण’ विशेष आकर्षण ठरली.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब हरिचंद्र शिवराम कढरे यांनी आपल्या दमदार शाहीरी आवाजात ‘भाग्यवंता घरी भजन कीर्तन’ ही गवळण तसेच ‘रणरागिणी हिरकणीचा पोवाडा’ सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. माजी जि.प. सदस्य संदीप बापू पाटील यांनी भक्तिपर भजनांनी वातावरण अधिकच भक्तिमय केले.
“शिक्षणाने हुशार होता येते; भक्तीने माणूस मोठा होतो!”
कार्यक्रमाच्या सांगता सत्रात ज्येष्ठ विचारवंत व माजी केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील, पं.स. अमळनेर यांनी ‘शिक्षण महत्त्वाचे आहेच; पण भक्तीही तितकीच महत्त्वाची कशी?’ या विषयावर मार्मिक प्रबोधन केले.
“आज गोकुळाष्टमी! मुरलीधराचा जन्मदिवस. ज्याने जगाला गीता दिली. शिक्षण माणसाला पोट भरण्याची कला शिकवते, तर भक्ती जीवन जगण्याची कला शिकवते. शिक्षणाने माणूस नोकरी मिळवतो; पण भक्तीने माणूस देव मिळवतो,” असे त्यांनी सांगितले.
“शिक्षणाने माणूस हुशार होतो; पण भक्ती त्याला नम्र, प्रेमळ आणि निगर्वी बनवते. ‘विद्या विनयेन शोभते’ असे म्हटले जाते; मात्र शिकूनही आई-वडिलांना विसरण्याची वेळ आली तर त्या शिक्षणाचा उपयोग काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कृष्ण, शबरी, संत तुकाराम आणि वाल्मिकी यांची उदाहरणे देत त्यांनी ज्ञानाला भक्तीची जोड किती आवश्यक आहे, हे स्पष्ट केले. “तुका म्हणे ज्ञान, भक्तीविण वाया गेले! भक्ती नसेल तर ज्ञान हे ओझेच आहे. पुस्तक वाचून हुशार होता येते; पण भक्तीने माणूस मोठा होतो,” असा संदेश त्यांनी दिला.
शेवटी, “शिकून शहाणा होण्यापेक्षा भक्ती करून माणूस व्हा; मानवता आणि माणुसकी जपा. पदवीपेक्षा प्रेम मोठे आहे. निर्व्यसनी, सदाचारी आणि कृष्णभक्त जीवन जगा,” असे आवाहन त्यांनी केले.
५६ भोगांचा नैवेद्य; आकर्षक सजावटीने वेधले लक्ष


श्रीकृष्णाची मूर्ती व मंदिराची आकर्षक सजावट मोहित पाटील आणि सौ. सीमा पाटील यांनी केली होती. आकर्षक सजावटीमुळे परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. श्रीकृष्णाला ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
या सोहळ्यास बेटावद परिसरातील अनेक मान्यवरांनी तब्बल पाच-सहा तास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास माजी मंत्री अनिल पाटील यांच्या धर्मपत्नी, माजी जि.प. सदस्या व माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री पाटील, त्यांचे पीए श्री. देशमुख, अनिल पाटील भिलालीकर, सौ. स्वाती पाटील, व्ही. डी. पाटील (लोण), राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, नगरसेवक महेश देशमुख, समाजसेवक रवींद्र पितांबर पाटील, महेश बापू पाटील, महिंद्र अण्णा पाटील, व्ही. ए. पाटील (माजी मुख्याध्यापक), अनिल दुसाने, गुलाबराव बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
आर.के. नगर कॉलनीतील तसेच परिसरातील कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मध्यरात्रीपर्यंत जन्माष्टमीचा आनंद घेतला.
“तुम्ही परके नाही, आमच्या हृदयातील आहात!”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांचे आभार मानताना प्राचार्य बापूसाहेब पी. के. पाटील भावुक झाले. ते म्हणाले, “आभार परक्यांचे मानतात; तुम्ही तर आमच्या हृदयातील आहात. सर्वांनी येऊन आम्हाला उपकृत केले. तुमच्या ऋणात राहू इच्छितो.”
भक्ती, संस्कृती, विचार आणि स्नेहाचा सुंदर संगम घडविणारा हा जन्माष्टमी सोहळा भक्तिमय, आनंदमय, सुखमय, मंगलमय आणि चैतन्यमय वातावरणात उत्साहात संपन्न




