अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून खासदार स्मिता वाघ यांचा सत्कार ,MRP विरोधी राष्ट्रीय आंदोलनाचे निवेदन सादर; संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचे खासदारांचे आश्वासन
1 min read

अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून खासदार स्मिता वाघ यांचा सत्कार ,MRP विरोधी राष्ट्रीय आंदोलनाचे निवेदन सादर; संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचे खासदारांचे आश्वासन

Loading

अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून खासदार स्मिता वाघ यांचा सत्कार

MRP विरोधी राष्ट्रीय आंदोलनाचे निवेदन सादर; संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचे खासदारांचे आश्वासन

अमळनेर प्रतिनिधी :
नुकताच प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार’ जाहीर झालेल्या जळगावच्या खासदार तथा उत्कृष्ट संसदपटू आदरणीय श्रीमती स्मिता ताई वाघ यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे शाल, पुष्पगुच्छ व संस्थेची डायरी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उल्लेखनीय संसदीय कार्याबद्दल आनंद व्यक्त करत अभिनंदन केले.

दरम्यान, अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने देशभर सुरू असलेल्या MRP विरोधी राष्ट्रीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार स्मिता वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले. ग्राहकांच्या हक्कांसाठी व बाजारातील वाढत्या अनियमिततेविरोधात संघटनेने सविनय आंदोलनात्मक भूमिका घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या शिष्टमंडळात अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव व जळगाव जिल्हा पालक डॉ. अनिल देशमुख, प्रांत कार्यकारिणी सदस्य तथा माजी प्रांत महिला प्रमुख ॲड. भारती अग्रवाल, जळगाव जिल्हा प्रभारी जिल्हाध्यक्ष सतीश देशमुख, जिल्हा सहसचिव व अमळनेर तालुका पालक भाईसाहेब मकसूद बोहरी, जिल्हा सहसचिव सुधाकर पाटील (पाचोरा), भडगाव तालुका उपाध्यक्ष निलेश बडगुजर, एरंडोल तालुका अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार मुल्लाजी नुरुद्दीन, अमळनेर तालुका अध्यक्षा तथा महिला उद्योजिका सौ. स्मिता चंद्रात्रे, अमळनेर कार्यकारिणी मार्गदर्शक व ज्येष्ठ पत्रकार घोडेगावकर तसेच साहित्यिक व कार्यकारिणी पदाधिकारी बाळासाहेब देशमुख यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

दि. २५ मे २०२६ रोजी देशभरात राबविण्यात आलेल्या MRP विरोधी आंदोलनाच्या निमित्ताने डॉ. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा शिष्टमंडळाने खासदार स्मिता वाघ यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी ग्राहकांच्या समस्या, बाजारातील किंमत नियंत्रण, MRP मधील विसंगती आणि ग्राहक संरक्षण यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत उपस्थित सर्व प्रतिनिधींनी आपली मते मांडत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

यावर प्रतिसाद देताना खासदार स्मिता ताई वाघ यांनी ग्राहकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, आगामी संसद अधिवेशनात हा विषय उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *