प्रविण पाटील फाउंडेशनचा हरित संकल्प : १००० सिड्स बॉलद्वारे वृक्षसंवर्धनाला चालना
1 min read

प्रविण पाटील फाउंडेशनचा हरित संकल्प : १००० सिड्स बॉलद्वारे वृक्षसंवर्धनाला चालना

Loading

 

प्रविण पाटील फाउंडेशनचा हरित संकल्प : १००० सिड्स बॉलद्वारे वृक्षसंवर्धनाला चालना

 

जळगाव प्रतिनिधी

पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन व जैवविविधता वाढविण्याच्या उद्देशाने प्रविण पाटील फाउंडेशन यांच्या तर्फे “१००० सिड्स बॉल निर्मिती” या अभिनव उपक्रमास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला सुंमनाजली बहुद्देशीय संस्था, राष्ट्रीय हरित सेना, निसर्ग मित्र समिती, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था तसेच एनसीसी विभाग नूतन मराठा महाविद्यालय यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक पद्धतीने माती, शेणखत व विविध देशी वृक्षांच्या बियांचा वापर करून सिड्स बॉल तयार करण्यात येत आहेत. यामध्ये निंब, वड, पिंपळ, करंज, गुलमोहर, सीताफळ, आंबा, जांभूळ, चिंच तसेच इतर देशी व पर्यावरणपूरक वृक्षांच्या बियांचा समावेश करण्यात आला आहे. या बियांच्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणावर सावलीची, फळझाडांची व पर्यावरण संतुलित ठेवणाऱ्या वृक्षांची निर्मिती होणार आहे.
तयार करण्यात आलेले सिड्स बॉल पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराळ भाग, मोकळी जमीन, वनक्षेत्र, रस्त्यालगतचे परिसर तसेच ग्रामीण भागात टाकण्यात येणार आहेत. पावसाच्या पाण्यामुळे हे सिड्स बॉल नैसर्गिकरित्या अंकुरित होऊन वृक्षनिर्मितीस चालना मिळणार आहे. कमी खर्चात व कमी पाण्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यासाठी सिड्स बॉल पद्धत अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उपक्रमात सहभागी स्वयंसेवक, विद्यार्थी व युवकांनी मोठ्या उत्साहाने सिड्स बॉल तयार केले. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. वाढते तापमान, प्रदूषण व पाण्याची टंचाई यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धन होणे काळाची गरज असल्याचेही सांगण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून आगामी काळात हजारो सिड्स बॉल तयार करून “हरित अभियान” अधिक व्यापक करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. “एक सिड्स बॉल – एक हरित भविष्य” हा संदेश देत नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले. उपक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण पाटील डॉ अनिता पाटील अक्षय सोनवणे महेंद्र साळुंखे सुजित चव्हाण प्रा शिवराज पाटील वसंत पाटील पंकज नाले व इतर प्रयत्नशील आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *