आदिवासी विद्यार्थ्यांवरील गंभीर आरोपांनी खळबळ , ‘१००% शिष्यवृत्ती’ असूनही लाखोंची वसुली, विद्यार्थिनींवरील अमानुष वागणुकीच्या तक्रारी; NSUI शिष्टमंडळाची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे धाव
![]()
आदिवासी विद्यार्थ्यांवरील गंभीर आरोपांनी खळबळ
‘१००% शिष्यवृत्ती’ असूनही लाखोंची वसुली, विद्यार्थिनींवरील अमानुष वागणुकीच्या तक्रारी; NSUI शिष्टमंडळाची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे धाव
नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार येथील एमकेडी (MKD) महाविद्यालयातील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींवरील कथित अन्यायाच्या गंभीर प्रकरणाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर NSUI च्या शिष्टमंडळाने पीडित विद्यार्थ्यांसह वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. संबंधित महाविद्यालयाचा संबंध शिंदे सेनेचे आमदार किशोर दराडे यांच्याशी असल्याचे शिष्टमंडळाने निवेदनात नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून १०० टक्के शिष्यवृत्ती मिळत असतानाही ‘इतर खर्च’ या नावाखाली प्रत्येकी एक लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने ३५० हून अधिक विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, विद्यार्थिनींना अमानुष वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. हॉस्टेलमध्ये राहत नसल्याचे कारण देत एका विद्यार्थिनीचे कपडे व झोपण्याची गादी जाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थिनींना धडा शिकवण्यासाठी सर्व मुलींचे वॉशरूम दिवसभर बंद ठेवण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, दोन विद्यार्थिनींना मासिक पाळी सुरू असल्याची खात्री करण्यासाठी महिला वॉर्डनकडून शारीरिक तपासणी करण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे.
नर्सिंगचे शिक्षण सुरू असूनही आजपर्यंत प्रॅक्टिकल्स न घेणे, दरवर्षी वेगवेगळ्या महाविद्यालयांची ओळखपत्रे (ID Card) देऊन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे अशा अनेक अनियमितता देखील शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
या सर्व प्रकरणाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सतेज (बंटी) पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे तसेच आमदार गोकुळ गिते यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी NSUI प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर पावरा, प्रदेश महासचिव श्वेता पाटील, सचिन पावरा यांच्यासह मोठ्या संख्येने पीडित विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
NSUI ने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

