ग्रामीण विज्ञानक्रांतीला राज्याचा सलाम! , वैज्ञानिक दृष्टिकोनाची चळवळ उभी करणारे अनिरुद्ध पाटील ‘सेवागौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुण्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव, ‘मिल के चलो असोसिएशन’च्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्यस्तरावर दखल; हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विज्ञानाची नवी पहाट
![]()
ग्रामीण विज्ञानक्रांतीला राज्याचा सलाम!
वैज्ञानिक दृष्टिकोनाची चळवळ उभी करणारे अनिरुद्ध पाटील ‘सेवागौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुण्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव
‘मिल के चलो असोसिएशन’च्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्यस्तरावर दखल; हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विज्ञानाची नवी पहाट
अमळनेर प्रतिनिधी
ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती आणि तर्कशुद्ध विचारांची बीजे रुजविणाऱ्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत मिल के चलो असोसिएशनचे संस्थापक व संचालक अनिरुद्ध प्रकाश पाटील यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘सेवागौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्यात झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर यांच्या हस्ते अनिरुद्ध पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
२०१९ मध्ये स्थापन झालेल्या मिल के चलो असोसिएशनने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिक्षणाची नवी दिशा निर्माण केली आहे. विज्ञान हा केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष अनुभवातून समजावा, मुलांनी प्रश्न विचारावेत, निरीक्षण करावे, प्रयोग करावेत आणि वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याची सवय जोपासावी, या ध्येयाने संस्था सातत्याने कार्यरत आहे.
संस्थेचा ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मोबाईल सायन्स लॅब’ हा मारवड विकास मंचाच्या सहकार्याने राबविण्यात येणारा उपक्रम विशेष ठरत आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामीण शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रयोगशाळाच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असून, विज्ञानाचे प्रयोग अनुभवत शिकण्याची संधी हजारो विद्यार्थ्यांना मिळत आहे.
याशिवाय ‘विज्ञानवेध’ उपक्रमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये अनुभवाधारित विज्ञान सत्रांचे आयोजन, ‘विज्ञानघर’ संकल्पनेद्वारे शाळेनंतर विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, कल्पकता आणि संशोधनाची वृत्ती विकसित करणे, तसेच ‘विज्ञानजागृती’ अभियानांतर्गत शिक्षकांना आधुनिक विज्ञान अध्यापनासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे.
संस्थेच्या विविध उपक्रमांतून आजपर्यंत हजारो विद्यार्थी आणि शिक्षक लाभान्वित झाले असून, ग्रामीण महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाची मजबूत चळवळ उभारण्यात संस्थेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. स्थानिक गरजांशी सुसंगत उपक्रम, अनुभवाधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाची प्रेरणा निर्माण करण्याच्या कार्यामुळे मिल के चलो असोसिएशनने राज्यातील नाविन्यपूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पुरस्कार स्वीकारताना अनिरुद्ध पाटील यांनी हा सन्मान संस्थेच्या संपूर्ण टीमचा, शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, पालकांचा, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि देणगीदारांचा असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाला दर्जेदार विज्ञान शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा, यासाठी अधिक व्यापक स्तरावर काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अनिरुद्ध पाटील यांच्या या यशाबद्दल शिक्षण, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत ग्रामीण महाराष्ट्रातील विज्ञान चळवळीला या सन्मानामुळे नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ‘सेवागौरव’ पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या एका व्यापक शैक्षणिक चळवळीचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

